डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानयज्ञ

234

अमेरिकेतील काटकसरीच्या दिवसांमध्ये बाबासाहेबांनी पोटाला चिमटा घेऊन खरेदी केलेल्या ग्रंथांची संख्या दोन हजार होती. यावरून त्यांच्या ज्ञानलालसेची कल्पना येते. कोणाही दलित विद्यार्थ्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानयज्ञाची कथा वाचली तर त्याला न्यूनगंड कधीही स्पर्श करू शकणार नाही. बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर प्रगती करणारे दलित समाजातील तरुण देशाच्या उन्नतीसाठी भरीव योगदान देण्यास सिद्ध होतील.

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्यास मान्यता दिली तो दिवस होता ४ जून १९१३. हिंदुस्थानी विद्यार्थ्याला अमेरिकेत जाण्याची संधी मिळणे त्या काळी दुर्मिळ मानले जाई. त्यातून अस्पृश्य वर्गातील विद्यार्थ्याला तर ही पर्वणी वाटणे स्वाभाविक होते. १९१३च्या जुलै महिन्यात बाबासाहेब आंबेडकर न्यूयॉर्कला पोहोचले. सुरुवातीला विश्वविद्यालयाच्या वसतिगृहात ते राहत होते; परंतु नंतर त्यांनी आपले निवासस्थान बदलले. नवल भथेना या पारशी मित्राबरोबर ते एका समाजमंदिरामध्ये राहावयास गेले. हिंदुस्थानमध्ये सामाजिक विषमतेचे चटके सहन केलेल्या बाबासाहेबांना तेथील मोकळे वातावरण आवडले. तेथील विद्यार्थी एकत्र हिंडत, फिरत, जेवण करत. या गोष्टीचा त्यांना अतिशय आनंद वाटत असे. समतेच्या वातावरणातील ते जीवन त्यांना साक्षात्कारच वाटे.

बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत असले तरी दलित समाजातील चळवळीकडे त्यांचे लक्ष होते. ‘घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’ अशी परिस्थिती होती. आपल्या वडिलांच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात अमेरिकेतील उत्साहवर्धक वातावरणाची माहिती देताना त्यांनी लिहिले होते की, ‘आपल्या अस्पृश्य समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने शिक्षण प्रसारासाठी झटले पाहिजे.’ पददलितांच्या दैन्यावर रामबाण उपाय म्हणजे या समाजामध्ये शिक्षणाचे वारे निर्माण झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. अन्य विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणे ते सुखविलासात रमले नाहीत. अर्धपोटी राहून ते दिवसभर ज्ञानसाधना करीत असत. शिष्यवृत्तीचा काही भाग घरखर्चासाठी पत्नीला पाठवावा लागे. उरलेल्या पैशांमध्ये ते अत्यंत काटकसरीने राहत असत. त्यांना सपाटून भूक लागे, परंतु फक्त एक कप कॉफी, दोन केक, एक बशी मासे किंवा सागुती एवढय़ावरच ते आपली भूक भागवत असत. प्रचंड ज्ञानलालसा त्यांच्या ठायी होती. त्यांचे सहाध्यायी पुढील काळात लोकांना सांगत असत की, ‘‘अमेरिकेतील शिक्षणाच्या संधीचा लाभ पुरेपूर करून घेण्यासाठी बाबासाहेब प्रत्येक क्षण हा सोन्याचा कण समजून वापरीत असत. धनाचा प्रत्येक कण त्यांनी योग्य ठिकाणी लावला.’’ अमेरिकेत जाऊन केवळ पदवी संपादन करणे, हे त्यांचे ध्येय नव्हते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि मानववंशशास्त्र या विषयांमध्ये पारंगत होण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी होती.

दररोज अठरा-अठरा तास ते अभ्यास करीत असत. अमेरिकेतील एका बहुश्रुत प्राध्यापकाची छाप आंबेडकरांवर पडली होती. त्याचे नाव होते एडविन आर. ए. सेलिग्मन. प्रेमळ स्वभावाचा हा विद्वान प्राध्यापक ओघवत्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान वाटत हिंडत असे. बाबासाहेबांचा बराच काळ त्यांच्याबरोबर जात असे. लाला लजपतराय या देशभक्त क्रांतिकारक नेत्याबरोबर त्यांचा स्नेहसंबंध होता.

दोन वर्षांच्या अखंड तपश्चर्येनंतर यशश्रीने बाबासाहेबांच्या गळ्यात माळ घातली. ‘प्राचीन भारतातील व्यापार’ (एन्शंट इंडियन कॉमर्स) या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी एम.एस.ची पदवी १९१५ मध्ये संपादन केली. १९१६ च्या मे महिन्यात डॉ. गोल्डन वेझर यांच्या वादकथा सभेमध्ये (सेमिनारमध्ये) त्यांनी ‘कास्टस् इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस ऍण्ड डेव्हलपमेंट’ या विषयावर प्रबंध वाचला. अशा रीतीने विद्येच्या प्रांगणामध्ये ते एकलव्यासारखे वेगाने धावत होते. अनेक दिवस संशोधक वृत्तीने ते परिश्रम करत होते. ‘नॅशनल डिव्हिडण्ड ऑफ इंडिया – ए हिस्टॉरिकल ऍण्ड ऍनॅलिटिकल स्टडी’ या विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी बरेच दिवस ते अभ्यास करत होते. या विषयावर त्यांनी प्रबंध पूर्ण केला. जून १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने तो स्वीकारला. डॉ. आंबेडकरांचे परिश्रम नेहमी पाहणारे त्यांचे सहाध्यायी त्यांच्या या यशामुळे एवढे प्रभावित झाले की विद्यापीठामध्ये या आनंदाप्रीत्यर्थ एक भव्य मेजवानीचा कार्यक्रम पार पडला.

हा ग्रंथ एवढय़ा उच्च दर्जाचा होता की कोलंबिया विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ ही अत्युच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला. बाबासाहेब आंबेडकरांनी कृतज्ञतेच्या भावनेने हा ग्रंथ बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केला होता. हीच खरी सामाजिक समरसता. या प्रबंधाची प्रस्तावना लिहिताना प्रा.सेलिग्मन म्हणतात, “या विषयावर इतके सखोल चिंतन पूर्वी कोणीही केलेले नाही.’’ यावरून बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेची उंची आपल्या लक्षात येईल. अमेरिकेतील काटकसरीच्या दिवसांमध्ये बाबासाहेबांनी पोटाला चिमटा घेऊन खरेदी केलेल्या ग्रंथांची संख्या दोन हजार होती. यावरून त्यांच्या ज्ञानलालसेची कल्पना येते. कोणाही दलित विद्यार्थ्याने आंबेडकरांच्या ज्ञानयज्ञाची कथा वाचली तर त्याला न्यूनगंड कधीही स्पर्श करू शकणार नाही. आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर प्रगती करणारे दलित समाजातील तरुण देशाच्या उन्नतीसाठी भरीव योगदान देण्यास सिद्ध होतील यात तीळमात्र शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या