राज्यातील गोरगरीबांची घरे उजळणार! महावितरणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून 500 रुपयांत वीज कनेक्शन

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील गोरगरीबांची घरे आता लख्ख प्रकाशाने उजळणार आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आतापर्यंत ग्रामीण भागातील सदर प्रवर्गातील अनेक कुटुंबांना घरगुती वीज जोडणी घेणे शक्य झालेले नाही. त्यांच्यासाठी महावितरणने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना आणली असून त्या माध्यमातून अवघ्या पाचशे रुपयांमध्ये वीज जोडणी दिली जाणार आहे.

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अनेक कुटुंबांच्या घरात आजही अंधार आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारच्या निर्देशानुसार महावितरणने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू केली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच त्याने आधारकार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्रासह महावितरणकडे अर्ज करावा. त्याचबरोबर पाचशे रुपयांची अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम पाच हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत दिली आहे. सदर अर्ज आल्यानंतर महावितरण परिसरात वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा असतील तर संबंधिताला अवघ्या पंधरा दिवसांत वीज जोडणी देणार आहे. त्यामुळे याचा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील कुटुंबांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या