उत्तर प्रदेशात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

सामना ऑनलाईन । मेरठ

त्रिपुरा, कोलकाता आणि तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी पुतळ्यांची विटंबना करण्यात आली आहे. पुतळ्यांच्या विटंबनेचे हे लोण आता उत्तर प्रदेशमध्येही पोहोचले असून मेरठमधील मवाना भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना; भाजपच्या ऑफिसवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मेरठमधील मवाना भागामध्ये मंगळवारी रात्री अज्ञात लोकांनी आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी वेगानं पसरली. त्यानंतर तेथील वातावरण तणावाचे असून लोकांनी नवा पुतळा लावण्याची मागणी केली आहे. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नवीन पुतळा बसवण्याचं आश्वासन दिलं आहे.

आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हस्तिनापूर विधानसभा भागातील माजी आमदार योगेश शर्मा यांनी एसडीएमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही असे शर्मा यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली नाराजी
त्रिपुरामध्ये लेनिन, तमिळनाडूमध्ये पेरियार, कोलकातामध्ये श्यामा मुखर्जी आणि आता उत्तर प्रदेशमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रंतप्रधानांसह गृह मंत्रालयानेही या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.