डॉ. द. ना. धनागरे

109

ठसा 

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. धनागरे यांचा जन्म व महाविद्यालयीन शिक्षण वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरची वाट धरली. अमेरिकेतील प्रतिष्ठत एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षणही घेतले. त्यानंतर आग्रा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. पुढील काळात कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यानंतर पुणे विद्यापीठात ते रुजू झाले. पुढे त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. त्यांची ही कारकीर्द खूप गाजली. डॉ . धनागरे यांची विद्यापीठातील कारकीर्द अनेक कारणानी गाजली. विदर्भातील असल्याने त्यांच्यावर ‘संघीय’ असा शिक्का मारून रान उठविण्यात आले होते. ‘सुटा ’ या विद्यापीठ शिक्षक संघटनेनेही त्यांच्याविरुद्ध काहूर उठवले होते. विद्यापीठातील एका कॉपी प्रकरणात डॉ. धनागरे यांनी ठाम भूमिका घेतल्याने त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते, परंतु त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरातील डाव्या संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहिल्या होत्या. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारासह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते. त्याचबरोबर ‘विदर्भवासी पुणे निवासी’ या संघटनेसह काही संस्थांमध्ये ते कार्यरत होते. सामाजिक चळवळी आणि त्यांचे समाजशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र, शेतकी समाजशास्त्र, शिक्षण आणि समाज, विकास आणि पर्यावरण, ग्रामीण हिंदुस्थानातील आणि प्रादेशिक प्रश्न हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते.  ‘अग्रेरियन मूव्हमेंट ऍण्ड गांधियन पॉलिटिक्स’, ‘पिजंट मूव्हमेंट इन इंडिया’, ‘रुरल ट्रान्स्फोर्मेशन इन इंडिया’ या संशोधन ग्रंथांबरोबरच ‘हिरवे अनुबंध’ हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला. गेल्या वर्षी ‘पॉप्युलिझम ऍण्ड पॉवर’ हा १९८० ते २०१४ या काळातील पश्चिम हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या चळवळीचे विश्लेषण करणारा ग्रंथ प्रकाशित झाला.

आपली प्रतिक्रिया द्या