डॉ. जगन्नाथ वाणी

>>प्रशांत गौतम

ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ, अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीत भरीव योगदान देणारे डॉ. जगन्नाथ वाणी यांचे नुकतेच कॅनडा येथे निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत ८३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. खान्देशातील धुळे येथील डॉ. वाणी यांनी आपल्या कार्यक्षेत्राची पताका थेट सातासमुद्रापार फडकवली. वाणी यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

डॉ. वाणी यांचे शालेय शिक्षण धुळय़ात, उच्च शिक्षण पुण्यात, तर विद्यावाचस्पती ही पदवी त्यांनी कॅनडात घेतली. १९६० ते १९६२ या कालावधीत धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटमधील त्यांचा सेवा काळ सोडला तर त्यांनी संपूर्ण कारकीर्द कॅनडा येथेच विस्तारली. १९९६ च्या सुमारास कॅलगिरी विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले. कॅनडा येथे आपल्या कार्यक्षेत्रात ते सदैव सक्रिय असले तरी त्यांची नाळ ही खान्देशच्या मातीशी जोडली होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जो विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम आहे, त्यासाठी डॉ. वाणी यांनीच चालना दिली. मनोरुग्णांसाठी आणि कितीतरी उपेक्षितांसाठी त्यांनी जे कार्य केले, त्याला तर तोड नाही. यासंदर्भात डॉ. वाणी यांनी देशात आणि परदेशात विविध उपक्रम राबविले आणि ते प्रत्यक्षात मार्गीही लावले. डॉ. वाणी यांच्या पत्नी कमलिनी या प्रदीर्घ काळ सिक्झोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त होत्या. गतवर्षी त्यांचे निधन झाले. डॉ.वाणी यांनी या आजाराच्या संदर्भात अभ्यास केला आणि या आजारावर काम करणारी पुण्यात संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे धुळय़ातील का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, पुण्यातील शारदा नेत्रालय, बधिर पुनर्वसन संस्था असे विविध उपक्रम त्यांनी सुरू केले. कॅनडात वेदांत सोसायटी ऑफ कॅलगिरी या संस्थेची त्यांनी स्थापना केली. जागतिक संगीत अभ्यासक्रम सुरू करण्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी त्याची मायभूमीशी नाळ जोडलेली असते. त्याचप्रमाणे डॉ. वाणी तिथेही मराठी भाषा संवर्धन आणि संगोपनाचे कितीतरी उपक्रम राबविले.

जनजागृतीसाठी डॉ. वाणी यांनी चित्रपट, लघुपट, ग्रंथप्रकाशन या माध्यमातून लक्षवेधी कार्य केले. वाणी यांच्यावर बालपणी राष्ट्र सेवा दलाचे उत्तम संस्कार झाले, ज्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग झाला. राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत त्याचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व तयार झाले. आणि खान्देशाप्रमाणे कॅनडातही ते लोकप्रिय झाले.

कॅनडात कॅलगरी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख असताना त्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठीच्या शिष्यवृत्ती सुरू केल्या, ज्याचा लाभ कितीतरी गुणवंत विद्यार्थ्यांना झाला व आजही होत असतो. कॅनडा येथे स्थायिक असले तरी त्यांचा संपर्क महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱया कार्यकर्त्यांशी सदैव असायचा. राष्ट्र सेवा दलात कार्यरत असल्यापासून त्यांच्यात सामाजिक कार्यक्षेत्रात कार्य करण्याची ओढ निर्माण झाली. जिची नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. डॉ. वाणी यांच्या कार्याचा देशात आणि परदेशात विविध पुरस्काराने गौरव झाला. २०१२ मध्ये त्यांचा ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान झाला. डॉ. वाणी हे महाराष्ट्रातल्या अनेक साहित्य संस्थांचे आधारवड होते. त्यांच्या पुढाकारातून अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक पाठबळ मिळाले. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प, महारोगी सेवा समिती, नसिमा हुजरूक यांची कोल्हापूर येथील संस्था हेल्पर्स ऑफ डी हॅण्डी कॅफ, जळगावच्या नीलिमा मिश्रा यांची भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन अशा कितीतरी महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था, पुढे आल्या, त्यामागे डॉ. वाणी यांचे परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉ. वाणी यांच्या निधनाने अनेक सामाजिक संस्थांचा एक आधारवडच गेला आहे.