डॉ. के. एच. संचेती

137

वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पुण्याचे नाव देशभर पोहचविणाऱया ‘पद्मविभूषण’ डॉ. के. एच. संचेती यांना यंदाचा प्रतिष्ठsचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ म्हणून डॉ. संचेती प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम अस्थिरोगतज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. डॉ. कांतीलाल संचेती यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी परीश्रम घ्यावे लागले. ते एमबीबीएस झाले. पुढे एफ.सी.पी. एस (आर्थो), ए.एस (आर्थो), एफ.सी.आर.एम.एडिनवर्ग (यू.के), एफ.ए.सी.एस, पी.एचडी, डी. लिट त्यांनी मिळवली. जेव्हा १९६५ साली डॉ. संचेतींनी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा हिंदुस्थानातील पोलिओचा प्रादुर्भाव उच्चांकावर होता. त्यांनी अपंग व पोलिओग्रस्त मुलांसाठी वैद्यकीय सेवा करायचे ठरवले. मोफत तपासणी आणि शस्त्र्ाक्रिया शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील अनेक गरजू मुलांवर उपाचार केले.  त्यांनी केलेल्या जवळपास ४३७ शिबिरातून लाखाहून अधिक मुलांना उपचार मिळाले आहेत. त्यांनी बारा हजार ५० शस्त्रक्रिया करून लहान मुलांचे अपंगत्व बरे केले आहे. गरजू मुलांना वीस हजार २०० कॅलिपर्स विनामोबदला दिले आहेत. १९७२ साली त्यांनी संचेती हॉस्पिटल फॉर ऑर्थोपेडिक ऍण्ड रिहेबिलिटेशनची स्थापना केली. आज २०० खाटांचे ऑर्थोपेडिक व ट्रॉमाची विशेष सेवा देणारे हॉस्पिटल आहे. हिंदुस्थानातील पहिल्या तीन मानांकित हॉस्पिटलमध्ये त्यांची गणना होते. पोलिओ निर्मूलनानंतर त्यांनी संधिवाताने ग्रस्त वृद्ध रुग्णांच्या उपचारावर लक्ष केंद्रित केले. संधिवाताने ग्रस्त रुग्णांसाठी वाजवी दरातील त्यांच्या उपयोगी असे हिंदुस्थानी बनावटीचे गुडघा आणि खुब्याचे इम्पांल्ट डिझाईन केले. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाचे महत्त्व आणि गरज जाणून त्यांनी संचेती हेल्थकेअर ऍकॅडमीची स्थापना केली. एवढेच नाही तर संचेती यांना हॉस्पिटल डिझायनिंगची आवड आहे. त्यांनी अनेक हॉस्पिटलसला याबाबतीत कन्सलटन्सी दिली आहे. अध्यायन हा डॉ. संचेती यांचा आवडीचा छंद आहे. त्यांनी ३०० पेक्षा जास्त अस्थिरोगतज्ञांना गेल्या ५० वर्षांत शिकविले. शिस्त, रुग्णसेवेचे तत्पर पालन, वेळेचे काटेकोर पालन करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.

आपली प्रतिक्रिया द्या