>> डॉ. मनोहर देसाई
आपल्या देशामध्ये खूप पूर्वीपासून ‘ठसा छपाई’ या प्रकाराने कापडांवर ठसे उमटवून छपाई करण्याचे तंत्र विकसित झाले होते. लाकडाच्या सपाट ठोकळ्यावर हव्या असणाऱया डिझाइन्स कोरून त्या विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या रंगात बुडवून त्याचा ठसा कापडावर घेण्याची पद्धत विकसित झाली. विविध भागांत या छपाईला विविध नावेसुद्धा आहेत. सध्या या कलेला ‘ब्लॉक प्रिंटिंग’ असे संबोधले जाते. अशा पद्धतीच्या ब्लॉक प्रिंटिंगने छपाई करण्याच्या पद्धतीला राजस्थानमध्ये ‘बागरू’, ‘दाबू’, ‘सांगानेरी’ छपाई तंत्र असे संबोधले जाते. गुजरातच्या कच्छमध्ये या प्रकाराला ‘अज्रक’ छपाई म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये याच पद्धतीची छपाई असणारे एक तंत्र म्हणजे ‘पिलखुवा छपाई’.
हिंदुस्थान हा जसा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तसाच तो येथील विविध कला आणि संस्कृतीच्या जतनामुळेसुद्धा जगभर ओळखला जातो. प्रत्येक राज्यामध्ये त्यांची स्वतची खाद्य, वस्त्र, वास्तुकला संस्कृती अस्तित्वात होती व आजही ती टिकून आहे. या विविध संस्कृती एका राज्यातून दुसऱया राज्यांमध्ये अगदी सहजच पोहोचल्या. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात तर राज्याच्या सीमा सोडाच, परंतु जगभरातल्या कानाकोपऱयातून कोणत्याही उपलब्ध कला प्रकाराचे साहित्य नव्या पिढीला उपलब्ध आहे. आपल्या देशामध्ये खूप पूर्वीपासून ‘ठसा छपाई’ या प्रकाराने कापडांवर ठसे उमटवून छपाई करण्याचे तंत्र विकसित झाले होते. लाकडाच्या सपाट ठोकळ्यावर हव्या असणाऱया डिझाइन्स कोरून त्या विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या रंगात बुडवून त्याचा ठसा कापडावर घेण्याची पद्धत विकसित झाली. विविध भागांत या छपाईला विविध नावेसुद्धा आहेत. सध्या या कलेला ‘ब्लॉक प्रिंटिंग’ असे संबोधले जाते. अशा पद्धतीच्या ब्लॉक प्रिंटिंगने छपाई करण्याच्या पद्धतीला राजस्थानमध्ये ‘बागरू’, ‘दाबू’, ‘सांगानेरी’ छपाई तंत्र असे संबोधले जाते. गुजरातच्या कच्छमध्ये या प्रकाराला ‘अज्रक’ छपाई म्हणतात. येथे एक संपूर्ण गावच या छपाईसाठी वसवले गेले आहे. आंध्र प्रदेशमध्ये याला ‘कलमकारी’, तर मध्य प्रदेशमध्ये ‘बाघ’ छपाई असे म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये याच पद्धतीची छपाई असणारे एक तंत्र म्हणजे ‘पिलखुवा छपाई’. आपल्या देशातील अतिशय दुर्मिळ अशा या छपाई तंत्राचा वापर करणारी करणाऱया ‘पिलखुवा’ कला प्रकाराबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
‘पिलखुवा’ हा शब्द एका मजेशीर घटनेतून पुढे आला. राजदरबाराच्या सेवेत असणाऱया एका हत्तीचे पिलू हरवले. त्याचा शोध घेण्याचे काम चालू होते. शोध घेता घेता शिपाई एका गावात आले. त्यांनी लोकांना याची माहिती दिली ते म्हणाले, “हाथी का पिल्ला खोया’’ आणि त्याच गावात ते पिल्लू सापडले. ‘पिल्ला खोया ते गाव’ अशा संवादाच्या पुनरावृत्तीतून व स्थानिक भाषेचा प्रभाव पडून या गावाचे नाव ‘पिलखुवा’ असे पडले. आपल्या देशात अशा विविध कारणांमुळे नावे प्राप्त झालेली अनेक गावे आहेत. त्यातील अनेक नावे खूप मजेदार आहेत, परंतु तो या लेखाचा विषय नाही, तर या ‘पिलखुवा’ गावात वसाहतीत असणाऱया लोकांनी उपजिविकेसाठी अनेक व्यवसाय स्वीकारले. अनेक व्यापारी या गावामध्ये येत असत. कापडाचे सूत तयार करणे, सूत रंगवणे तसेच तयार कापडावर विविध ठसे उमटवून त्यातून डिझाइन असलेले कापड तयार करणे याकरिता हळूहळू हे गाव सर्वांसाठी परिचित होऊ लागले. छपाई तंत्र अधिक सुबक होण्यासाठी पुढे इतर राज्यांमधून काही कारागीरसुद्धा येथे स्थलांतरित झाले. ठसा छपाई पद्धतीने तयार झालेले कापड बाजारात सर्वांच्या पसंतीस पडत होते आणि पिलखुवा या गावातील हे कापड असल्यामुळे या कलेला ‘पिलखुवा छपाई कला’ अशी ओळख मिळाली.
सध्याच्या पिढीमध्ये घर सजावटीसाठी विशेष तज्ञांना बोलवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट केली जाते. बेडरूममधील बेडशीट आणि उशीची कव्हर्स घेताना त्यातील डिझाइन्स, रंग, कापडाचा प्रकार अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. ‘पिलखुवा छपाई’मध्ये आज बेडशीट आणि उशीची कव्हर्स अशा स्वरूपात छपाई चालू असून या वस्तूंना जगभर मागणी आहे. नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेल्या वस्तू बाजारात जरी उपलब्ध असल्या तरीही हिंदुस्थानी पद्धतीच्या डिझाइन्स आणि रंगसंगती यांचा आग्रह धरणारा ग्राहक आजही या वस्तूंव्यतिरिक्त इतर पद्धतीचे पर्याय स्वीकारायला तयार नाही. त्यामुळेच ‘पिलखुवा छपाई कला’ अजूनही टिकून आहे.
हिंदुस्थानात ब्लॉक प्रिंटिंग मुख्यत पाच प्रकारांमध्ये विभागली जाते.
कच्छ, गुजरातचे अजरक ब्लॉक प्रिंटः या प्रकारची ब्लॉक प्रिंटिंग प्राचीन मोहेंजोदारोमधून सुरू झाली आहे. यात वापरलेल्या डिझाइन्स बहुधा गणिती आकाराच्या असतात. या प्रक्रियेसाठी नैसर्गिक रंग वापरले जातात, ज्यामध्ये इंडिगो रंग प्रामुख्याने वापरला जातो.
राजस्थानचे बागरू, डाबू प्रिंट : डाबू ब्लॉक प्रिंटिंगसाठी प्रसिद्ध. हे एक प्रकारचे मातीविरोधक ब्लॉक प्रिंटिंग आहे. यामध्ये मातीच्या पेस्टचा वापर करून कपडय़ावर पॅटर्न साकारले जातात, त्यानंतर ते रंगवले जातात. मातीच्या पेस्टने झाकलेले/ ब्लॉक केलेले पॅटर्न रंगवले जात नाहीत. ते तसेच राहतात. यातील कलाछटांमध्ये मुख्यत पिवळा आणि काळा रंग यांचे संयोजन असते. .
सांगानेर प्रिंटः सांगानेर प्रिंटला त्याच्या मृदू रंग संयोजनासाठी आणि तिरकस ओळींमध्ये पुनरावृत्त डिझाइनसाठी ओळखले जाते. यातून तयार झालेले कपडे तसेच घर सजावटीच्या उत्पादनांसाठी तर वापरले जातात, त्याचबरोबर सांगानेरी पद्धतीने छपाई केलेल्या साडय़ासुद्धा बाजारात प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानी पद्धतीचे व्यक्तिमत्त्व दिसावे म्हणून अनेक सेलिब्रेटी तसेच राजकीय क्षेत्रातील महिला या साडय़ा परिधान करतात. या पद्धतीच्या डिझाइनमध्ये फुलांचे विविध आकार त्याचप्रमाणे प्राणी किंवा काही फळेसुद्धा समाविष्ट आहेत.
आंध्र प्रदेशचे कलमकारी प्रिंटः ही ब्लॉक प्रिंटिंग तंत्रकथा कथा सांगण्याच्या कलेपासून विकसित झाली आहे. कवी, गायक आणि विद्वान हिंदू पुराणांच्या कथा चित्रित करत असत, ज्यामुळे कलमकारी प्रिंट्स निर्माण झाल्या. या प्रिंट्स वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातात. यामध्ये कापडावर रेखाटलेल्या आकारांवर मेणाचे लेपन केले जाते. ज्या भागात मेण लागले आहे, त्या भागात रंग लागत नाही, तर कापडावरील इतर भाग रंगीत होतो. कापडावरील रंगकामासाठी यात केवळ नैसर्गिक रंग वापरले जातात.
मध्य प्रदेशचे बाघ प्रिंटः मध्य प्रदेशच्या बाघ नदीजवळून सुरू झालेले हे छपाई तंत्र पुढे बाघ छपाई तंत्र अशा नावानेच ओळखले जाऊ लागले. यात कापड रंगवण्यासाठी वापरलेले रंग सर्व नैसर्गिक व तेजस्वी आहेत. यातील डिझाइनमध्ये ताज महाल, फुलं, मशरूम असे अनेक आकार वापरलेले दिसतात.
नव्या बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी आज ही कला धडपडत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढील पिढी ही कला टिकवण्यासाठी प्रयत्न करताना सुद्धा दिसते. त्याचबरोबर पुढील पिढीतील या कलाकारांच्या कुटुंबातील सदस्य विविध क्षेत्रातील शिक्षण घेऊन येथून दुस्रया ठिकाणी स्थलांतरित सुद्धा झाले आहेत.
आपली कलासंस्कृती टिकून राहावी याकरिता येथील कलाकारांची देशवासीयांना एकच विनंती असते आणि ती म्हणजे आपल्या देशात या कलाप्रकारातून तयार झालेल्या वस्तूंचा वापर करावा. या कलेला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. याच छपाई तंत्राच्या पद्धतीने तयार झालेल्या कापडाचा वापर शर्ट, टॉप, फॅशन क्षेत्रातील नवनव्या डिझाइनपासून तयार झालेले कपडे यामध्येसुद्धा झालेला दिसतो. जगभरातून आज अनेक पर्यटक आपल्या देशात येतात आणि हिंदुस्थानी पद्धतीने तयार झालेल्या या वस्तू सोबत घेऊन येथील संस्कृती व कला प्रकार या विषयावर चर्चा करतात आणि त्याचे भरभरून कौतुक करतात. आपल्या कलेचा ठसा जगभर उमटला आहे. आता फक्त पुढच्या पिढीच्या मनावर तो ठसा उमटावा व हे कला प्रकार टिकून राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत हीच नव्या पिढीला विनंती.