निकालाचा गोंधळ होणार नसल्याचे हमीपत्र द्या, डॉ. मुणगेकर यांचे कुलगुरूंना पत्र

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई विद्यापीठाचे निकाल नोव्हेंबरपर्यंत लटकल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. असे असताना विद्यापीठाने कोणताही विचार न करता पुन्हा हिवाळी सत्राच्या सर्व परीक्षांसाठी ‘ऑनलाइन पेपर तपासणी’चा घाट घातला आहे. त्यामुळे विद्यापीठाला जर खरोखरच निकालात गोंधळ होणार नाही अशी खात्री असेल तर तसे ‘हमीपत्र’ उच्च न्यायालयात सादर करावे, अशी मागणी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना आज पत्र दिले.

विद्यापीठाच्या टीवायच्या निकालात या वर्षी अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले. शिवाय विद्यार्थ्यांना नाहक मनःस्तापही सहन करावा लागला. हा सर्व प्रकार अचानक ऑनलाइन पेपर तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे घडला असताना विद्यापीठ ‘ऑनलाइन पेपर तपासणी’वर ठाम आहे. त्यामुळे आताच्या निकालाच्या घोटाळ्यावरून विद्यापीठाने कोणताच बोध घेतला नसल्याचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे. राज्यातील इतर विद्यापीठांनी ऑनलाइन पेपर तपासणीचा निर्णय घेताना टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबवली. त्यामुळे मुंबई विद्यापीठानेही त्याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने ऑनलाइन पेपर तपासणी राबवली पाहिजे, असे ते म्हणाले.

…तरीही गोंधळ उडणारच
विद्यापीठाने आता ऑनलाइन पेपर तपासणीसाठी संपूर्ण यंत्रणा सक्षम ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ४०० हून जास्त परीक्षा आणि सुमारे पाच लाखांवर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका नीट तपासून निकाल जाहीर होतील याबाबत आपल्याला शंका असल्याचे डॉ. मुणगेकर यांनी म्हटले आहे. तरीही विद्यापीठ आपल्या मुद्दय़ावर ठाम असेल तर ‘आम्ही सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने करून सर्व परीक्षांचे निकाल कायद्यानुसार ४५ दिवसांच्या आत लावू’ असे ‘हमीपत्र’ उच्च न्यायालयात सादर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या