डॉ. प्रदीप उगिले

62

अभय मिरजकर

वैद्यकीय क्षेत्रात लातूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविणारे डॉ. प्रदीप उगिले यांच्या अचानक जाण्याचा लातूरकरांना धक्का बसणे स्वाभाविकच आहे. एड्स निर्मूलन क्षेत्रात काही तरी वेगळे करण्याची त्यांची जिद्द होती आणि त्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन स्वकष्टावर  डॉ. उगिले यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. रेणापूर तालुक्यात रामवाडी या गावात जन्मलेल्या उगिले यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. गावात चौथीपर्यंत शिक्षणाची सोय असली तरी पुढील शिक्षणासाठी नजीकच्या खरोडा गावी जावे लागायचे. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून संभाजीनगरात घाटी गाठले आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईत दाखल झाले. जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न होताच. १९९३-९४ च्या सुमारास जे. जे. मध्ये सुरू झालेल्या आशिया खंडातील एचआयव्ही एड्स वॉर्डाचे प्रमुख रजिस्ट्रार म्हणून त्यांनी कामाचा प्रारंभ केला. लातूरच्या सरकारी रुग्णालयात एड्सतज्ञ म्हणून रुजू झाले. ज्या वॉर्डात कर्मचारी जाण्यास धजावत नसत, अधिकारी घाबरत असत तिथे डॉ. उगिले रुग्णांना धीर देत. एवढेच नव्हे तर उपचार कसा करावा याचेही ते प्रशिक्षण देत असत. म्हणूनच ते रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात चांगले नाते निर्माण करू शकले आणि म्हणूनच डॉ. उगिले अनेकांना आपल्याच कुटुंबातील एक सदस्य वाटत असत. डॉ. उगिले यांनी सरकारी रुग्णालयात हजारो एड्सग्रस्त रुग्णांवर उपचार केले. त्यावेळी त्यांच्या मनात एक हॉस्पिटल असावे अशी कल्पना आली, परंतु अशा प्रकारचे हॉस्पिटल राज्यातच काय देशात कुठेही नाही हेही लक्षात आले. मात्र आपल्या निर्णयाचा अनेक रुग्णांना भविष्यात फायदाच होणार आहे हे त्यांनी जाणले आणि २००३ च्या सुमारास हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरची सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयाचा अनेक एचआयव्ही बाधित रुग्णांना फायदाच झाला. अनेकांना जीवदान मिळाले आणि प्रवाहाची दिशा बदलून आपण ठरविलेल्या इच्छित मार्गाने त्यांनी वेगळी वाट निर्माण केली आणि ती जपली. यातूनच त्यांच्या कार्याची ओळख निर्माण झाली. विचित्र मानसिकतेतून जाणारा एखादा रुग्ण जेव्हा डॉ. उगिले यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येई तेव्हा ते उत्तम प्रबोधन आणि उद्बोधन करीत असत. हाही एक सामान्य रोगच आहे आणि त्यावर योग्य उपचार केले की सामान्यांसारखेच आयुष्य जगता येते असा आश्वासक धीर ते देत असत. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या नातेवाईकास केलेले प्रकृतीचे अचूक निदान सांगत असत. उपचाराची माहिती, किती दिवसांत रुग्ण बरा होणार हेही सांगत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना मिळत गेला. हजारो एड्सबाधित लोकांना त्यांनी जीवदान दिले. डॉ. उगिले यांच्या निधनाने वेगळी पाऊलवाट निर्माण करणारा देवदूत चिरंतनाच्या प्रवासास गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या