…म्हणून आंदोलन चिघळलं, प्रकाश आंबडेकर यांचा दावा

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदला राज्यातील सगळ्या संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सोमवारी झालेल्या घटनेनंतर आज (मंगळवारी) राज्यभरात कार्यकर्त्यांनी बंद पुकारला असेल तर तो मागे घ्यावा, आंदोलन थांबवावे, असेही आवाहन त्यांनी केले. मात्र हे आंदोलन का चिघळलं याचं कारण त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

‘गेल्या आठवड्यात वडगाव बुद्रुक या गावात गोविंद गायकवाड यांच्या समाधीवरून वाद झाला होता. संभाजी महाराजांचे शरीर शिवून गोविंद गायकवाड यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले होते. परंतु, असं काही घडलंच नसल्याचं म्हणत शिव प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडीने गायकवाड यांच्या समाधीला विरोध केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही समाधी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ९ जणांना अटकही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवरच, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांचे कार्यकर्ते गावातून मिरवणूक काढणार होते. त्यांना पोलिसांनी रोखलं आणि मग या कार्यकर्त्यांनीच कोरेगाव स्तंभाकडे येणाऱ्या जमावावर दगडफेक केली’, असा दावा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यासोबतच पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे सोमवारी हिंसक घटना घडल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी उद्या म्हणजेच बुधवारी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. हिंसाचार पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या