कोरोना विळख्यातून मुक्तता कधी?

  • डॉ. राकेश शर्मा

सातत्याने आपले स्वरूप बदलणाऱ्या विषाणूंना रोखण्यासाठी लस तयार करणे अत्यंत आव्हानात्मक असते. याच कारणामुळे सामान्य विषाणुजन्य थंडीतापाच्या आजारावर आपल्याला प्रत्येक वर्षी नवीन लस तयार करावी लागते. कोरोनाच्या विषाणूवर अशा प्रकारे दरवर्षी नवीन लस शोधावी लागेल का, हे अद्याप तज्ञ सांगू शकत नाहीत. जसजसा काळ पुढे जात राहील, तसतसे या लसींमुळे आपल्याला किती काळापर्यंत संरक्षण मिळते, हे समजत जाईल. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आणि विषाणूचा नवीन अवतार तयार होण्यापूर्वीच त्याच्या फैलावाची साखळी तोडणे गरजेचे ठरते.

कोविड-19 पसरविणाऱ्या कोरोना विषाणूचा ब्रिटनमधील नवा अवतार (म्युटन्ट), दक्षिण आफ्रिकेतील म्युटन्ट आणि ब्राझीलमधील म्युटन्ट यापाठोपाठ आता हिंदुस्थानातील ‘डबल म्युटन्ट’ चर्चेत आहे. हा ‘डबल म्युटन्ट’ अतिजलद फैलावणारा आणि अतिधोकादायक, जीवघेणा आहे का? सध्या उपलब्ध झालेली लस या ‘डबल म्युटन्ट’वर परिणामकारक ठरेल का? असे अनेक प्रश्न सध्या हिंदुस्थान समाजाला सतावत आहेत, परंतु सुरुवातीला असलेले विषाणूचे स्वरूप आणि सध्याची विविध रूपे यात फारसा फरक नसून नवी रूपे पहिल्यापेक्षा उलट कमी घातक आहेत असे काही तज्ञांचे म्हणणे आहे, परंतु विषाणूच्या प्रत्येक रूपापासून आपण आपला बचाव केलाच पाहिजे, खबरदारी बाळगलीच पाहिजे, असे तज्ञ सांगतात. तज्ञांच्या मते ‘डबल म्युटन्ट’ हे विषाणूचे नवीनच रूप समोर आले आहे. या रूपातील विषाणूपासून तूर्तास खूप मोठा धोका संभवत नाही, परंतु विषाणू स्वतःमध्ये बदल घडवीत आहे या एकाच वास्तवामुळे आपण सजग राहायला हवे. कारण बदलांच्या या मालिकेतील विषाणूचे कोणतेही एखादे रूप घातक ठरू शकते. सध्या जगाला हीच एकमेव चिंता आहे. अन्यथा, सध्या हाती असलेल्या आकडेवारीनुसार ‘डबल म्युटन्ट’मुळे खूप मोठा धोका असल्याचे दिसत नाही.

विषाणूचे प्रत्येक रूप हा विषाणूने स्वतःमध्ये घडवून आणलेल्या एका किंवा अनेक बदलांचा परिपाक असतो आणि प्रत्येक म्युटन्ट म्हणजे व्हेरिएन्टचे स्वतःचे काही वैशिष्टय़ असते. सध्याचा डबल म्युटन्ट विषाणू हा दोन वेळा झालेल्या बदलांचा परिपाक असल्याचे दिसून येते. एल-452-आर आणि ई-484-क्यू ही ती दोन रूपे होत. हा विषाणू अन्य स्वरूपांपेक्षा वेगळाच असून ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएन्टमध्ये आणि या व्हेरिएन्टमध्ये काहीही साधर्म्य नाही. दोन वेगवेगळे म्युटन्ट हे एकाच म्युटन्टच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्याची ही घटना अजब वाटत असली तरी त्यात वेगळे असे काहीच नाही. विषाणूचा असा विकास अनेकदा होत असतो. किंबहुना सर्वच म्युटन्ट हे अनेक बदलांनंतर तयार झालेले असतात. सर्वाधिक म्युटन्ट एकाहून अधिक प्रकारांपासूनच बनलेले असतात. आपण त्यांना आफ्रिकन व्हेरिएन्ट किंवा यू.के. व्हेरिएन्ट म्हणतो ते आपल्या सोयीसाठी! विषाणूचा जनुकीय क्रम (जीनोम सीक्वेन्स) सतत बदलत असतो. विषाणूचे गुणधर्म एकाहून अधिक म्युटन्टवर अवलंबून असतात.

सध्या हिंदुस्थानात आढळलेला डबल म्युटन्ट हिंदुस्थानात आधीपासून असलेल्या विषाणूपासूनच तयार झालेला असावा, अशी शक्यता अधिक आहे. कारण हा म्युटन्ट अन्यत्र कुठेही आढळलेला नाही. सध्या तरी हा म्युटन्ट अन्य कोणत्या तरी देशातून आला असावा असे आपण म्हणू शकत नाही. यावरून असे सूचित होते की, महाराष्ट्रात सध्या वाढत चाललेली रुग्णसंख्या हा डबल म्युटन्टचा परिणाम नसावा. डबल म्युटन्ट सर्वप्रथम डिसेंबरमध्येच आढळून आला होता. म्हणजेच, तो अधिक वेगाने फैलावतो असेही म्हणता येणार नाही. पंजाब, केरळ, दिल्ली यांसारख्या अन्य राज्यांत रुग्णसंख्या वाढत आहे, परंतु अवघे 2 टक्के रुग्ण डबल म्युटन्ट विषाणूने ग्रस्त आहेत असे आढळून आले आहे. त्यामुळे त्याची अतिचिंता करणेही योग्य ठरणार नाही असे तज्ञांचे मत आहे. डबल म्युटन्ट हे विषाणूचे वेगाने पसरणारे रूप आहे असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पहिल्यापेक्षा विषाणूचे दुसरे रूप किंवा दुसऱ्यापेक्षा तिसरे रूप अधिक घातक असते असेही पुराव्यानिशी म्हणता येत नाही. डबल म्युटन्ट वेगाने पसरत नसल्याचे आढळून आले असल्याने तो अधिक आक्रमक नाही हेही स्पष्ट होते. हा विषाणू गेले दोन-तीन महिने अस्तित्वात असल्यामुळे तो वेगाने फैलावतो आहे असे म्हणता येत नाही. विषाणूच्या या स्वरूपाविषयी आगामी काळात आपल्याला आणखी तपशीलवार माहिती मिळू शकेल.

सध्या या ‘डबल म्युटेन्ट’वर जे संशोधन सुरू आहे, त्यात प्रामुख्याने हा विषाणू कृत्रिमरीत्या तयार करून शरीरात निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीज परिणामशून्य करणारे काही गुणधर्म त्यात आहेत का, याचा अभ्यास केला जात आहे. एकदा ही बाब लक्षात आली की, या व्हेरिएन्टवर औषध कोणते द्यावे याविषयी ठोसपणे सांगता येईल. वस्तुतः अशा प्रकारच्या सातत्याने आपले स्वरूप बदलणाऱ्या विषाणूंना रोखण्यासाठी लस तयार करणे अत्यंत आव्हानात्मक असते. याच कारणामुळे सामान्य विषाणूजन्य थंडीतापाच्या आजारावर आपल्याला प्रत्येक वर्षी नवीन लस तयार करावी लागते. कोरोनाच्या विषाणूवर अशा प्रकारे दरवर्षी नवीन लस शोधावी लागेल का, हे अद्याप तज्ञ सांगू शकत नाहीत. जसजसा काळ पुढे जात राहील, तसतसे या लसींमुळे आपल्याला किती काळापर्यंत संरक्षण मिळते हे समजत जाईल.

अशा स्थितीत आपल्याला दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. एक म्हणजे, कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकते. दुसरी गोष्ट म्हणजे, विषाणूचा नवीन अवतार तयार होण्यापूर्वीच त्याच्या फैलावाची साखळी तोडणे गरजेचे ठरते. म्हणजेच, सध्या उपलब्ध असलेल्या लसी घेण्यासाठी लोकांनी मोठय़ा संख्येने आणि लवकरात लवकर पुढे आले पाहिजे. तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुण्याच्या नियमांचे सातत्याने पालन करून विषाणूची साखळी तोडली पाहिजे. कोरोनाचा प्रसार यापुढील काळात कसा होईल किंवा त्याचे किती म्युटेन्ट तयार होतील, हे आता सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी हीच दोन महत्त्वाची आयुधे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे कमी पडत असलेले डोस आपण बाहेरून मागविले तर आगामी तीन महिन्यांत आपण आपल्या अधिकांश लोकसंख्येला लसीचे डोस देऊ शकतो. साठ किंवा सत्तर टक्के लोकसंख्येला लस दिल्यामुळे आपल्यामध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजेच समूह प्रतिकारशक्ती विकसित होईल, असे म्हटले जात असले तरी तसे सांगणे अवघड असल्याचे तज्ञ म्हणतात. तसे पाहायला गेल्यास काही शहरांमध्ये तर अनेकांच्या शरीरात आजमितीस अँटिबॉडीज आहेत. सीरम सर्वेक्षणांमधून असे स्पष्ट झाले आहे की, अनेकांना कोरोना होऊन गेल्याचे कळलेही नाही. म्हणजेच एका अर्थाने आपल्यात समूह प्रतिकारशक्ती विकसित होण्याची वेळ जवळ येत चालली आहे. तथापि, नवनवीन व्हेरिएन्ट विकसित होत असल्यामुळे आपण केवळ नियम जरी पाळले आणि विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर कोरोनाच्या विळख्यातून आपण लवकरात लवकर आपली मुक्तता करून घेऊ शकतो.

लसीचा प्रभाव

सध्या हातात असलेली लस नव्या स्वरूपाच्या विषाणूवर उपयुक्त ठरेल का? हा प्रश्न लोकांना पडणे अत्यंत स्वाभाविक आहे. पहिले कारण असे की, हा पूर्णपणे नवीन विषाणू आहे. दुसरे कारण असे की,  एल-452-आर आणि ई-484-क्यू ही दोन रूपे एकत्र आली तेव्हा ‘इम्यून एस्केप’ची प्रक्रिया घडून आली असावी असे संशोधनांती दिसून आले आहे. ‘इम्यून एस्केप’चा अर्थ असा की, जेव्हा विषाणू शरीरात प्रवेश करेल, तेव्हा त्या विषाणूला संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकार यंत्रणा ओळखू शकत नाही. अशा वेळी लसी कमी प्रभावी ठरतात. अर्थात ही बाब प्रयोगातून स्पष्ट व्हायला हवी. त्यासाठी लस घेतलेल्या व्यक्तींच्या सीरमचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात आणि नव्या प्रकारचा विषाणू रोखण्यास ते सक्षम आहेत का हे पाहिले जाते. नव्या प्रकारच्या विषाणूबाबत लसीची परिणामकारकता अशा प्रयोगांनंतरच समजते आणि असे प्रयोग सध्या सुरू असल्याने त्याविषयी काही बोलणे घाईचे ठरेल. नवा प्रकार तयार होताना ‘इम्यून एस्केप’ची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर घडून आली असेल तर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. तथापि, सध्या अस्तित्वात असलेल्या लसी कोरोनाच्या कोणत्याही प्रकारावर परिणामकारक असतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

(लेखक हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजीचे संचालक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या