देशात सध्या आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती – डॉ. कसबे

सामना प्रतिनिधी । संगमनेर

देशात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असुन, सर्वत्र एवढा उच्छाद सुरू असताना पंतप्रधान याबाबत मौन बाळगत आहेत, हे देशासाठी अधिकच घातक आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, विचार, लिखाण, कविता, व्यंगचित्र, कला यातून व्यक्त होणेसुद्धा गुन्हा ठरविला जात असुन, देशाच्या नागरिकांना थेट तुरूंगच दाखविला जात असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. डॉ. कसबे हे वाढदिवसानिमित्त जुन्या मित्रांना भेटण्यासाठी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी राज्य आणि देशातील एकूणच स्थितीविषयी दैनिक ‘सामना’शी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

डॉ. कसबे म्हणाले, पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आल्या. आणिबाणीच्या काळात केवळ तुरूंगात टाकले जायचे, पण सध्या थेट खून करून संपविले जात आहे. देशाची राजकिय, सामाजिक स्थिती अंत्यंत वाईट झाली आहे. किंबहुना यापेक्षा वाईट काही असूच शकत नाही. सर्वत्र मुस्कटदाबी आणि दहशत पसरवण्याचे काम जोरात चालू आहे. आणीबाणीच्या काळात वाटत नव्हती तेवढी भीती आज वाटत आहे. असे असले तरी यांना आवरणार तरी कोण? असा उद्विग्न सवाल ज्येष्ठ विचारवंत कसबे यांनी केला. देशाला असलेल्या वैचारिक परंपरेचा मोठा वारसा संपुष्टात येतो की काय असे वाटते आहे. केवळ एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून त्याला अटक करण्यापासून थेट खून करण्यापर्यंत लोकांची मजल जाते. गोरक्षणाच्या नावाखाली मांडलेला उच्छाद, हत्या, तसेच सोशल मीडियातून व्यक्त होणे म्हणजे तुरूंगवास ही असहिष्णुता नाही, तर काय आहे? आणि यावर पंतप्रधान मौन बाळगतात. हे त्याहूनही गंभीर आहे. देशाबाहेर बुद्ध आणि गांधींशिवाय काही सांगण्यासारखे नाही, म्हणून नाईलाजास्तव बोलावे लागते. हा देशच मुळी बुद्ध आणि गांधींमुळे ओळखला जातो. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर आदींनी घातलेल्या भक्कम पायावर देशाचा सध्याचा डोलारा उभा आहे. देशाची घटना कोणीही बदलू शकत नाही. या सरकारला तर अजिबात जमणार नाही.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या विद्वान आणि कर्तबगारदेखील आहेत; परंतु मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यात त्यांना सोबत नेण्याचे साधे संकेत पाळले जात नाही. सगळ्या मंत्र्यांच्या विविध खात्यातील योजनांच्या घोषणादेखील मोदीच करतात. सरकारातल्या इतर मंत्र्यांना बोलूच दिले जात नसेल, तर ती एकाधिकारशाही नाही तर काय? हा देश आणि एवढी मोठी लोकशाही चालवणे मोदींना जमणार नाही. नोटाबंदीचा प्रयोग संपूर्णतः फसल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, वास्तविक नोटाबंदी घोषीत केली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आता भ्रष्ट राजकारण्यांना त्यांच्याकडील काळा पैसा जाळून टाकण्याशिवाय पर्याय नाही, अशी माझ्यासह आम जनतेची भावना झाली होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली. उलट या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा आरोप डॉ. कसबे यांनी केला. दरम्यान, तरूणांनी आणि पत्रकारांनी आता देशाचा लौकिक टिकविण्यासाठी पुढे आले पाहिजे. कोणलाही न घाबरता व्यक्त झाले पाहिजे. विचार मांडले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मतांच्या राजकारणासाठीच कश्मीर प्रश्नाचे घोंगडे भीजत
कश्मीर प्रश्न कोणालाच सोडवायचा नाही. वास्तविक हिंदुस्थानात विलिनीकरणाला तेथील राजाने उशीर केला म्हणून कश्मीर प्रश्न निर्माण झाला हा इतिहास आहे. परंतु हल्ली कशाहीसाठी कोणाला जबाबदार धरण्याची नवीच पद्धत तयार होत आहे. हिंदु-मुस्लीमांमधे कायम तेढ निर्माण राहावी व त्याचा फायदा मतांच्या राजकारणासाठी व्हावा, यासाठी काश्मीर प्रश्न भिजत ठेवला जाणार आहे. कितीही मेजॉरीटी असली तरी हे सरकार कधीच कलम ३७० रद्द करू शकत नाही. राजकीय फायद्यांसाठी त्यांची तशी मानसिकता नाही. समान नागरी कायदा देशाची खरी गरज आहे, परंतू तो कोणी करणार नाही, असेही डॉ. कसबे म्हणाले.