डॉ. सदाशिव शिवदे

<<डॉ. सच्चिदानंद शेवडे>>

[email protected]

एका सकाळी पुण्याहून फोन आला. आवाज परिचित. ‘शेवडे साहेब, ऐतिहासिक वाडय़ांच्या लेखनात तुमच्या चापेकर पर्वचा संदर्भ वापरतो आहे. अर्थात क्रेडिट देतोच आहे, पण आधी सांगितलेले बरे,’ असे म्हणत एका हास्याने आमच्या संभाषणाची सुरुवात झाली. डॉ. सदाशिव शिवदे यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने खरे तर संदर्भाची गोष्ट कळवली नसती तरी चालली असती. कारण ते संदर्भग्रंथ नमूद करणार होते. आजकाल परिच्छेदही उचलून आपल्या नावाने खपवणारे लोक दिसतात, ते मूळ लेखकाला श्रेयही देत नाहीत. खुशाल आपल्या नावावर दडपून देतात, अशा काळात डॉ. शिवदे यांच्यासारख्या संशोधकाचे महत्त्व कळते.

तसे ते पशुवैद्यक क्षेत्रातील होते. प्राणी तपासताना इतिहासाकडे कसे वळले ते त्यांनाही कळले नाही. कदाचित हा सातारच्या मातीचा गुण असावा. मराठय़ांच्या इतिहासाची संस्कृत साधने असा काहीसा वेगळा विषय निवडून ते पीएचडी झाले. एकीकडे ती साधने पाहताना ‘बुधभूषण’सारखा ग्रंथ पाहूनच बहुधा ते शंभूराजांकडे ओढले गेले असावेत. मग झपाटल्यासारखा अभ्यास सुरू झाला. शंभूराजांबद्दल जी साधने मिळतील ती अत्यंत बारकाईने अभ्यासणे सुरू झाले. नोट्स काढणे सुरू झाले. अनेक लेखक आणि इतिहासकारांनी लिहिलेले ग्रंथ वाचून झाले. त्यातून साकारला ‘ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा’ हा ग्रंथ.

डॉ. सदाशिव शिवदे यांची पहिली भेट त्यांच्या घरी पुण्यात झाली. निवृत्तीनंतर ते पूर्णवेळ इतिहास अध्ययनात रमून गेले होते. त्या वेळी नुकताच प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांनी भेट दिला. त्यानंतर दोन तास इतिहासाच्या एका वेगळ्या कालखंडात आम्ही दोघे रमून गेलो. प्रत्यक्ष परिचय नव्हता तेव्हाही आम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतो. प्रत्यक्ष भेट हा उपचार होता इतकेच.

मराठय़ांच्या इतिहासावर सेन यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी ग्रंथांचे अनुवाद त्यांनी केले. अत्यंत मोलाचे असलेले हे ग्रंथ तब्बल नव्वद वर्षांनी अनुवादित होऊन मराठीत आले. मराठय़ांची प्रशासकीय व्यवस्था आणि मराठय़ांचे लष्करी प्रशासन हे ते ग्रंथ होत. प्रतापदुर्ग महात्म्य हे नावे संशोधन साधन त्यांनी प्रकाशित केले. एकीकडे पशुवैद्य असल्यामुळे त्यांनी ‘माझी गुरं, माझी माणसं’ हा कथासंग्रह लिहिला. तर बाकी अन्य लेखन केवळ इतिहासावर केले. महाराणी येसूबाई, शिवपत्नी सईबाई, महाराणी ताराराणी या यांच्यावर त्यांनी चरित्रात्मक लेखन केले. ललित चरित्र लिहिले की अधिक लोकांपर्यंत अगदी सहजपणे जाते हे लक्षात घेऊन त्यांनी आपली पुस्तके रटाळ आणि कंटाळवाणी होणार नाहीत याची काळजी घेतली.

इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक यात लोकांची नेहमी गल्लत होते. संशोधक हा मूळ कागदपत्रे वाचून आणि अभ्यासांती एखादा निष्कर्ष काढतो. अभ्यासक हा अनेक संशोधकांचे लेखन वाचून नीरक्षीरविवेकाने त्यातील योग्य तो भाग घेतो आणि लोकांसमोर लेखन अथवा व्याख्यानातून मांडतो. खरे तर हे अगदी त्रोटकपणे मांडले आहे. याला आणखी आयाम आहेत हे नाकारत नाही. डॉ. शिवदे हे एकाच वेळी दोन्ही होते. ते अभ्यासातून संशोधनाकडे वळले असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यातून शंभूराजे हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय होय. त्यांच्यावर त्यांनी ‘संभाजीराजांची पत्रे’ हा संपादित ग्रंथ तर ‘रणझुंझार’ हा शंभूराजांच्या नऊ वर्षांच्या वादळी कारकीर्दीचा आढावा घेणारा ग्रंथ लिहिला. त्याच्या अखेरीस ते काव्यात म्हणतात,

जिथे जाहले रुधीर पावन हौतात्म्याच्या यज्ञात

मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत

गेली वीस वर्षे ते इतिहासाच्या कामात गर्क झालेले असे संशोधक होते. त्यांच्या संग्रहात पांच हजारांहून अधिक ग्रंथ होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गाईड म्हणून मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने शास्त्रशुद्ध संशोधक, ज्येष्ठ वक्ता आणि लेखक आपल्यातून हरपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या