प्रतिभावान लेखक-कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन

वाईतील प्रतिथयश डॉक्टर, प्रतिभावान लेखक-कवी, अनुवादक, वक्ते, कथाकार, विज्ञान लेखक, रंगकर्मी डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (60) यांचे आज गुरूवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली त्यांची झुंज अखेर थांबली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

डॉ. अभ्यंकर यांनी आयुष्यभर वैद्यकीय सेवा करता करता साहित्य सेवाही केली. लेखक, कवी, विज्ञान लेखक, प्रभावी वक्ता, रंगकर्मी अशा भूमिकांमध्ये ते लीलया वावरले. अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या चतुरस्त व्यक्तिमत्त्वाची मोहिनी नेहमीच सर्वांवर राहिली. अखेरपर्यंत आवडीच्या क्षेत्रात कार्यरत गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी ते धीरोदात्तपणे लढत होते. एवढा गंभीर आजार होऊनही त्याला शांतपणे तोंड देत अखेरपर्यंत ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहिले. सन 2022 च्या एका दिवाळी अंकात त्यांनी स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाल्याविषयी एक भावपूर्ण तरी तटस्थतेने एक लेख लिहिला होता. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली.

अलीकडेच प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने असंख्य भावस्पर्शी शोकभावना समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत.