बारामतीचे अतिक्रमण रोखण्याचा विडा मी उचलला आहे – खा. डॉ. सुजय विखे-पाटील

4213

मावळ व माढा मतदार संघात जे झाले तेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात होणार आहे. येथील जनता सुज्ञ आहे. विकासाच्या मागे उभी राहणारी आहे त्यामुळे कोणी कितीही जोर लावला तरी राम शिंदेच भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्राचं ज्यांनी वाटोळे केले त्या राष्ट्रवादीचे आता नगर जिल्ह्यावर अतिक्रमण होऊ पाहत आहे परंतु हे अतिक्रमण रोखण्याचा विडा मी उचलला आहे, असे सांगत अगामी निवडणूकीत युतीचेच 222 आमदार निवडून येणार असल्याचा दावा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जामखेड येथे आयोजित सभेत बोलताना केला.

यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, सभापती सुभाष अव्हाड, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, पणन संचालक पांडुरंग उबाळे, बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर,किसनराव ढवळे, भारत काकडे, अमजद पठाण, संजय गोपाळघरे, मनोज कुलकर्णी, दत्ता गिते, प्रा. अरुण वराट, हनुमंत वराट, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, विखे गटाच्या वतीने भूमिका मांडताना बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात म्हणाले की, पालकमंत्री राम शिंदे यांना विरोध करूनच आमचे राजकारण सुरू होते. बाजार समितीत पालकमंत्र्यांच्या विरोधात पॅनल उभा करून निवडणूक लढलो होतो. सातत्याने त्यांच्या विरोधात संघर्ष केला. दरम्यान लोकसभेच्या काळात खासदार साहेब आपण भाजपात गेलात. खासदारही झालात. परंतू लोकसभेनंतर विखे गटाचे कार्यकर्ते म्हणून आम्हा कार्यकर्त्यांना पालकमंत्री गटाकडून विश्वासात घेतले जात नाही. कार्यक्रमांना सन्मानाने बोलवले जात नाही. विखे गट म्हणून जर कायम डिक्कीत ठेवणार असाल तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा राळेभात यांनी दिला. भाजपा मित्रपक्षांच्या जाहिर कार्यक्रमात विखे समर्थकांवर होणार्या अन्यायाचा पाढाच खासदार विखे यांच्या समोरच विखे समर्थक सुधीर राळेभात यांनी वाचत पालकमंत्री गटात खळबळ उडवून दिली.

दरम्यान पुढे बोलताना खासदार विखे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या काळात जे माझ्या गाडीत होते तेच आता पवारांच्या गाडीत आहेत परंतू काळजी करू नका त्यांना मतदानाच्या दोन दिवस आधी आपल्या गाडीत कसे आणायचे ही जबाबदारी माझी असे सांगत मतदारसंघात राजकीय भूकंप घडवण्याचे संकेत विखे यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जे डिजीटल बोर्ड लावले होते तेच बोर्ड आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात लावण्याची हिम्मत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहे काय? असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.

कर्जत जामखेडची स्वाभिमानी जनता बारामतीच्या अफजलखानाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी तोफ भाजपाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे युवा नेते अमजद पठाण डागत सभेत जोश भरला.

सरपंच आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयदादा काशिद म्हणाले की, पवारांच्या पैशांवर जाऊ नका. आपल्या हक्काचा माणूस कोण आहे हे ओळखा. आता तुम्हा आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाहेरची हवा बाहेरच पाठवून द्यायची. पैशांपेक्षा माणूसकी महत्वाची आहे, असे सांगत पालकमंत्र्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करण्याचा निर्धार केला.

आपली प्रतिक्रिया द्या