डॉ. वि. भा. देशपांडे

106

आरती श्यामल जोशी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नाटकांचे मोलाचे योगदान आहे. ना’ट्यविश्वातील विविध भूमिकांचा, टप्प्यांचा अभ्यास करून जे जे नाटकाविषयी दिसले ते ते लिखाणातून अभ्यासपूर्ण पद्धतीने रसिक, वाचक, अभ्यासकांसमोर डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांनी मांडले. नाटय़सृष्टीसाठी आणि वाचकांसाठी ते ‘विभा’च होते. नाटकांनी समाजजीवनातील मोठा भाग व्यापला आहे. समाजातील चळवळी, परिवर्तन अशा अनेक अंगांनी नाटकाचा इतिहास समृद्ध झाला आहे. या कलेचा आस्वाद केवळ दृश्य माध्यमांपुरता न राहता त्याचे विविध पैलू जनतेसमोर आणण्याचे काम विभांनी प्रामाणिकपणे केले. १९३८ मध्ये जन्मलेल्या विभा यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यामुळे मराठी नाटकांचे विश्व अनेक अंगांनी उलगडणे त्यांच्यासाठी सोयीचे झाले. नोकरीत मिळालेला छंद जोपासण्याचा आनंद त्यांच्या लिखाणातून जाणवतो. डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली. अनेकांमध्ये संवादाचा धागा होत विभांनी नाटकाविषयी जे हाती सापडेल ते अभ्यासपूर्ण पद्धतीने साहित्यात मांडले. ज्यामध्ये नाट्य समीक्षा, नाट्य कलावंतांची मुलाखत, रंगभूमीवरचा प्रवास आलेख, स्तंभलेखन, नाट्यशास्त्राचे पाठ, सभासंमेलनातील नाटकाविषयीचे व्याख्यान अशा अनेक प्रांतांतून त्यांनी नाटकाची सेवा केली. उमेदीच्या काळात के. नारायण यांचा सहवास त्यांना लाभला आणि विभांना नाटकाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. भालबा केळकर यांच्या पीडीए या प्रायोगिक नाट्यसंस्थेत काही वर्षे रंगकर्मी म्हणूनही त्यांनी काम केले. विभांनी विष्णुदास भावे ते तेंडुलकरांपर्यंतच्या नाटककारांच्या संहितांचा अभ्यास करून तीन खंडांचे प्रकाशन केले. मराठी नाट्यकोश हा १२०० पानांचा मौल्यवान ठेवा त्यांनी साहित्यसृष्टीला दिला. आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा, कालचक्र- एक अभ्यास, नटसम्राट- एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यभ्रमणगाथा, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) अशा कितीतरी पुस्तकांची नावे घेता येतील ज्यात विभांचा ठसा स्पष्ट जाणवतो. अभ्यासकांसाठी हा ठेवा मार्गदर्शक आहे. नाट्य व्यक्तिरेखाटन, पौराणिक, ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाटय़विषयक लेख), निवडक नाट्य मनोगते, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी- स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ- रंगभूमीचा इतिहास (दोन खंड), माझा नाट्य लेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान, लोकनाटक, रायगडाला जेव्हा जाग येते-  एक सिंहावलोकन अशी सुमारे एकूण २५नाट्यविषयक लेखनाची पुस्तके त्यांनी सहजसोप्या भाषेत रसिकांसह वाचकांना दिली आहेत. त्यांचे पस्तीसहून अधिक संपादनात्मक लेखन प्रसिद्ध आहे. गौरव ग्रंथांचे संपादनही मोठ्या तन्मयतेने त्यांनी केलेले दिसते. कोणत्याही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला उपस्थिती लावणारे विभा हे नाट्य कलावंतांचे आणि रसिकांचे जवळचे मित्र. त्यामुळेच त्यांच्या लिखाणावर मनस्वी प्रेम करणारे वाचक त्यांनी मिळवले. कुठलेही नाटक आवडले नाही तरी त्या नाटकावर विभांनी कधीही टोकाची टीका केली नाही. यातील संबंधितांना अगदी प्रेमळ शब्दांत आपल्या चुका दाखवून देणे पसंत केले. विभांकडून समीक्षा करून घेणे हे अनेकांना मोठेपणाचे वाटत असे. विभांच्या या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना मोठे पुरस्कार, मानसन्मान देऊन गौरविले. दक्षिणेकडील संपन्न नाट्यपरंपराही त्यांनी अभ्यासली होती. नवनवीन विषय हाताळून नाट्यसृष्टीत चैतन्य कसे निर्माण होईल याकडेच त्यांचा कायम कल राहिला. मात्र विभांच्या निधनाने नाट्य क्षेत्रातील ही उर्मीच लुप्त झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या