त्रिपुरातील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वि.ल. धारूकर

31

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. वि.ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. वि.ल. धारूरकर यांनी कोल्हापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवेला प्रारंभ केला होता. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांची निवड झाली. गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत असताना डॉ. धारूरकर यांनी विविध पदे भूषविली. अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे संचालक, जेएनयू, दिल्ली येथे निवड समितीवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘नॅक’च्या पीअर टीमचेही सदस्य राहिले असून, सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘लिबरल आर्टस्’ या विभागाच्या संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी ते सांभाळत आहेत.

डॉ. धारूरकर यांनी अध्यापनाचे काम करीत असताना विविध विषयांवर लेखन केलेले असून, त्यांची ३२ पुस्तके प्रकाशित आहेत. यामध्ये २६ मराठी तर ६ इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी देश-विदेशातील चर्चा, परिसंवाद, कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदविलेला असून, जगभरातील नामांकित रिचर्स जर्नलमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात काम केलेले आहे. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. वि.ल. धारूरकर यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या