त्रिपुरातील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. वि. ल. धारूरकर

45

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. वि.ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. वि.ल. धारूरकर यांनी कोल्हापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवेला प्रारंभ केला होता. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांची निवड झाली. गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत असताना डॉ. धारूरकर यांनी विविध पदे भूषविली. अवॅâडमिक स्टाफ कॉलेजचे संचालक, जेएनयू, दिल्ली येथे निवड समितीवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘नॅक’च्या पीअर टीमचेही ते सदस्य राहिले असून, सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘लिबरल आर्टस्’ या विभागाच्या संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत.

डॉ. धारूरकर यांनी अध्यापनाचे काम करीत असताना विविध विषयांवर लेखन केलेले असून, त्यांची ३२ पुस्तके प्रकाशित आहेत. यामध्ये २६ मराठी तर ६ इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी देश-विदेशातील चर्चा, परिसंवाद, कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदविलेला असून, जगभरातील नामांकित रिसर्च जर्नलमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात काम केलेले आहे. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉ. वि.ल. धारूरकर यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

त्रिपुरातील जनतेस मध्यवर्ती प्रवाहात आणणार – धारुरकर
या नियुक्तीबद्दल केरळ येथून प्रतिक्रिया देताना डॉ. धारूरकर म्हणाले की, १५ मार्च रोजी कोलकाता येथे झालेल्या मुलाखतीत ११ उमेदवारांमध्ये सर्वोत्तम कामगिरीमुळे केंद्र सरकारने केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर माझी नियुक्ती केली. त्रिपुरातील ३० जनजातींचा अभ्यास करून त्यावर प्रकल्प केला होता. आता माझ्या कारकीर्दीत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या विषयाला प्राधान्य देणार आहे. त्रिपुरा या सीमावर्ती राज्यात हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रसार आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवून हिंदुस्थानी संस्कृतीशी त्यांचे नाते समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रदेशातील विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे कार्य करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युनेस्कोच्या वतीने २००७ मध्ये अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक मूल्यमापन गुणवत्ता कक्षाची कामगिरी उत्तम करण्याची संधी मिळाली होती. तसे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प या विद्यापीठात राबवणार आहे. १९८० साली शिवाजी विद्यापीठात माझी नियुक्ती झाली. तेथे २४ पत्रकार घडवले. १९८९ ला संभाजीनगर येथे आल्यावर प्रसारमाध्यमांसाठी आम्ही अनेक विद्यार्थी घडवित विद्यापीठाला अग्रेसर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला. लिबरल आर्ट व पुरातत्व विभागाचा संचालक म्हणून इतिहास उजळविण्याचा प्रयत्न केला. ‘बामू’च्या पत्रकारिता विभागाचे अनेक विद्यार्थी केंद्र सरकारात उच्चपदावर असल्याचा अभिमान आहे. त्रिपुरातील विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर देणार आहे. त्रिपुरा राज्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास माझे प्राधान्य असेल.

आपली प्रतिक्रिया द्या