ड्रॅगन पॅलेस मेडीटेशन सेंटरचं राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

21

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपुरातील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस येथे दहा एकर जागेत भव्य अप्रतिम शिल्पकृती असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. अल्पावधीत निर्माण करण्यात आलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक व राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रपरिषदेमध्ये ही माहिती दिली.

dragon-palace-1

ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. विशेष अतिथी म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्ध वंदना तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे.

या अप्रतीम विपश्यना मेडीटेशन सेंटरचा बांधकाम आराखडा महाराष्ट्र व गुजरात येथील शिल्पतज्ज्ञांनी तयार केला असून यामध्ये गुजरातमधील सुप्रसिद्ध शिल्पतज्ज्ञ ठाकूरभाई पारेख यांचा समावेश आहे. पॅगोड्याच्या सभोवताली उत्कृष्ट, आकर्षक, कलात्मक शिल्पकृती चेन्नई येथील कुशल कारागिरांनी साकार केली आहे. तर इगतपुरी येथील दिडशे कुशल कारागिरांनी दिवसरात्र परिश्रम करून भव्यदिव्य पॅगोडाचे बांधकाम केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही कुंभारे यांनी यावेळी केले.

आपली प्रतिक्रिया द्या