
युवासेनेच्या दणक्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाला जाग आली असून चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या जगन्नाथ शंकरशेट वसतिगृहातील गटारींची साफसाईची तसेच नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या जगन्नाथ शंकरशेट वसतिगृह येथील गटारे गेली अनेक दिवसांपासून तुंबलेली तसेच मलमुत्रासह घाण पसरली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले होते.
विद्यार्थ्यांनी वसतिगृहप्रमुख यांच्याकडे तक्रारी करून देखील कोणतीही उपाययोजना होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी सदर गटार लाईन तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. युवासेनेच्या दणक्यानंतर आता नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
सर्व वसतिगृहांचा पाहणी दौरा करा
विद्यापीठातील सर्व वसतिगृहे आवश्यक सोयी सुविधा नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांसह सर्व वसतिगृहांचा पाहणी दौरा आयोजित करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष तक्रारी ऐकून त्यांना आवश्यक सोयी सुविधा मिळण्यास मदत होईल, अशी मागणी युवासेनेने कुलगुरुंकडे केली आहे.