हिमाचलात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये जोरदार घमासान, सत्तास्थापनेचा दावा करताना राज्यातील नेते गायब

कॉंग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत हिमाचल प्रदेशात दणदणीत विजय मिळवला असला तरी आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पक्षात जोरदार घमासान सुरू झाले आहे. आज काँग्रेसने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला पण यावेळी राज्यातील नेते गायब होते. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी आक्रमक होत पक्ष कार्यालयालाच घेराव घातला. त्यानंतर केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत रात्री झालेल्या बैठकीत नेतानिवडीवर निर्णय होऊ शकला नाही. हा निर्णय आता हायकमांडकडे सोपवण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात 68 पैकी 40 जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयात दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांचा मोठा वाटा असून आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रतिभा सिंह यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू यांचेही नाव आघाडीवर आहे.

सुक्खू-सिंह समर्थकांमध्ये धक्काबुक्की

मुख्यमंत्रीपदावर सहा नेत्यांनी दावा सांगितल्याने घमासान सुरू झाले आहे. शुक्रवारी प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी थेट काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला. भूपेश बघेल यांची गाडी रोखून घोषणा दिल्या. यावेळी सुक्खू आणि प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. रात्री आठ वाजताच्या सुमारास पेंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत नेतानिवडीसाठी बैठक झाली. या बैठकीला सर्व 40 आमदार उपस्थित होते. मात्र, बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे हा निर्णय हायकमांडकडे सोपवण्यात आला. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असे शुक्ला यांनी बैठकीनंतर सांगितले.

  • काँग्रेसचे हिमाचल प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्यासह राजपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता वा नवनिर्वाचित आमदार उपस्थित नव्हता.
  • प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, सुखविंदर सिंह सुक्खू, राजेंद्र राणा ठाकूर, चंद्र कुमार, धनीराम शांडिल असे सहा नेते मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत.