जगण्याचा जल्लोष

  • क्षितीज झारापकर

वेलकम JINDAGI एक वेगळा विषय आपल्याला आनंदी जगण्याचा कानमंत्र देतो.

ब्लॅक लिस्ट म्हणून एक प्रकार पाश्चात्त्य देशांत अलीकडे प्रचलित झालाय. माणूस उतारवयात पोहोचल्यावर त्याच्या तोवर राहून गेलेल्या इच्छांची एक यादी करतो आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात ती यादी संपवण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना एका फारच वेगळ्या स्वरूपात त्रिकूट या संस्थेच्या नवीन नाटकात ‘वेलकम जिंदगी’मध्ये मांडली गेली आहे. पार्ल्यातील एक वडिलोपर्जित जुना वाडा, त्यात राहणारे बाप-लेक आणि त्यांची ही कथा. पण कथेपेक्षा बाप-लेकाच्या या व्यक्तिरेखाच खूप वेगळ्या आहेत. बाप दत्तात्रय धैर्यवान वय १०२ वर्षे आणि मुलगा दीनानाथ धैर्यवान वय ७५ वर्षे. राजन ताम्हाणे या प्रस्थापित दिग्दर्शकाने येथे दोन प्रस्थापित आणि प्रथितयश नटांची योजना केलेली आहे. बाप डॉ. गिरीश ओक आणि मुलगा भरत जाधव. येथेच ‘वेलकम जिंदगी’ जिंकलेलं आहे.

डॉ. गिरीश ओक यांच्या अभिनय कौशल्याबाबत काहीही सांगण्याची गरजच नाही. येथे तर त्यांना एक उत्स्फूर्त ऑथर बॅक्ड भूमिका मिळालेली आहे. संपूर्ण नाटकभर ते प्रेक्षकांचा ताबा घेतात. आयुष्यावर नितांत प्रेम करणारा आर्मी मॅन म्हणून दत्तात्रय धैर्यवान अक्षरशः आपल्यावर गारुडच घालतो. नाटकभर हा १०२ वर्षांचा तरणाबांड सैनिक आपल्याला सतत गुंतवून ठेवतो. यात डॉक्टरांचं, दिग्दर्शकाचं आणि नाटकाचं असं तिहेरी यश आहे. नाटकाच्या शेवटच्या दहा मिनिटांत मात्र डॉक्टरसाहेबांचा अभिनय खऱ्या अर्थाने आपल्यासमोर येतो आणि आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. पण हे सगळं या नाटकाची जमेची बाजू नाही. गिरीश ओक यांच्याकडून हे अपेक्षितच आहे. जे ओकांनी शेवटच्या दहा मिनिटांमध्ये आपल्याला दिलंय ते भरत जाधव या सुपरस्टारने मात्र संपूर्ण नाटकभर आपल्यासमोर ठेवून कमाल केलीय. भरतच्या अभिनयात इथे सुपरस्टारडमचा मागमूसही सापडत नाही. आपल्या अत्यंत ओळखीचा ‘सही’ भरत जाधव येथे कुठेच दिसत नाही. भरत हा अप्रतिम अभिनेता आहे हे त्याने याआधी ‘अधांतर’ या नाटकातून आणि ‘झिन चिक झिन’सारख्या चित्रपटातून दाखवलेलं आहे. येथेही भरत पुन्हा एकदा चाकोरीबाहेर जाऊन अभिनय करतो. आपल्याला थक्क करून टाकतो. दोन मतब्बर नटांची ही जुगलबंदी पाहण्याचं भाग्य नाट्यप्रेमींना हल्ली फार वाट्याला येत नाही. येथे ते आहे ही ‘वेलकम जिंदगी’ची खरी जमेची बाजू आहे. या दोघांबरोबर एक एकदम नवीन चुणचुणीत पोरगी शिवानी रांगोळे आहे. खरं तर असं नाटक एखाद्या नवीन रंगकर्मीला मिळणं हा नशिबाचाच भाग आहे. पण शिवानी त्याच्या पलीकडे जाते. दोन स्टार्ससमोर दिपून न जाता आपला ठसा उमटवणं सोपं नाही. शिवानीने दोघांच्या तोडीस तोड भूमिका साकारून राजन ताम्हाणेंचा तिच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

राजन ताम्हाणे हे एक मनस्वी दिग्दर्शक आहेत. सातत्याने चांगलं आणि वेगळं करणं हा त्यांचा आजवरचा ध्यास आहे. ‘वेलकम जिंदगी’ हेदेखील त्यांच्या त्या ध्यासात चपखल बसतं. हे नाटक चांगलंही आहे आणि वेगळंही आहे. मराठी नाटय़रसिक प्रेक्षक चोखंदळ आहे. तो सक्षम प्रयोगांमागे ठामपणे उभा राहतो हे वेळोवेळी दिसून आलंय. ‘वेलकम जिंदगी’चं दिग्दर्शन ताम्हाणेंनी अत्यंत साधं सोपं आणि सरळ केलंय. ताकदीचे कलाकार आणि सकस लेखन असल्यावर दिग्दर्शक एकूण नाटक इम्पॅक्टफूल होण्याकडे जास्त लक्ष देऊ शकतो हे येथे दिसतं. सौम्य जोशी यांनी खूप तरल आणि तितकंच प्रबोधनात्मक नाटक लिहिलंय. प्रबोधनात्मक अशासाठी की ‘वेलकम जिंदगी’मधल्या दोन व्यक्तिरेखा नेहमी आपल्याला कसं जगावं आणि कसं जगू नये हे सारखं सांगत राहतात. ‘वेलकम जिंदगी’मधून सौम्य जोशी अतिशय सौम्यपणे जीवनाचा मूलमंत्र सांगून जातात.

म्हाताऱ्या व्यक्तिरेखांवरची कथानकं खूपदा मेलोड्रामाटीक आणि कंटाळवाणी होऊ शकतात. पण ‘वेलकम जिंदगी’ तसं होत नाही. उलट ते उत्तरोत्तर अधिक मनोरंजक होत जातं. हे श्रेय लेखक सौम्य जोशी, दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि कलाकार डॉ. गिरीश ओक, भरत जाधव आणि शिवानी रांगोळे यांना विभागूनच द्यावं लागेल. या तीनमधील एकही बाजू ढिली पडते तर ‘वेलकम जिंदगी’चा डोलारा कोलमडून पडेल. ‘वेलकम जिंदगी’चा डोलारा एका जुन्या वाड्यात आहे. नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी एक खूपच रिऑलिस्टीक वाडा रंगमंचावर उभा केलाय. दोन व्यक्तिमत्त्वांतला फरक दाखवायला जुन्या आणि नव्या फ्रीजची कल्पकताही छान वाटते. राहुल रानडे यांचं संगीतही कथानकाला साजेसं आहे.

दोन म्हाताऱ्यांवर आधारित ‘वेलकम जिंदगी’ नेमकं काय आहे याबाबत नक्कीच प्रेक्षकांना कुतूहल असणार. पण ते सांगायचं म्हणजे मग नाटकाचं कथानक येथे सांगावं लागेल. ती निदान माझी पद्धत नाही. इतकं मात्र नक्की की वय कितीही झालं तरी बाप मुलांना आयुष्य म्हणजे काय हे शिकवायचं थांबत नाही आणि मुलं कितीही चुकली तरी बाप ते मनाला लावून घेत नाही या दोन टोकांच्या भावभावनांच्या मध्ये अनेक नाट्यमय प्रसंगांतून जीवनाची गंमत सांगणारं असं हे नाटक आहे. मराठी प्रेक्षकांना भावणाऱ्या सगळ्या मुद्दय़ांचं व्यवस्थित भान ठेवून रचलेलं नाटक म्हणजे ‘वेलकम जिंदगी’ आहे. ते वेगळं आहे कारण त्यात नेहमीप्रमाणे हीरो हिरोईन नाही, प्रेमकथा नाही किंवा बाप-मुलांमधला किंवा अन्य कौटुंबिक कलह नाही. राजकारण, समाजकारण आणि त्यावरचं कोणतंही भाष्य नाही आणि तरीही ते अत्यंत इंटरेस्टिंग नाटक आहे. याचं कारण म्हणजे माणसाने या जगात जगताना कसं जगावं आणि जाताना कसं जावं हे उलगडून सांगणारा एक जल्लोष म्हणजे त्रिकूट या संस्थेतर्फे राजन ताम्हाणे आणि शेखर ताम्हाणे निर्मित ‘वेलकम जिंदगी’.

l दर्जा    : ***
l नाटक  : वेलकम JINDAGI
l निर्मिती : त्रिकूट
l निर्माते  : शेखर ताम्हाणे, राजन ताम्हाणे
l लेखक  : सौम्य जोशी
l नेपथ्य   : प्रदीप मुळ्ये
l संगीत   : राहुल रानडे
l सूत्रधार  : गोट्या सावंत
l दिग्दर्शक : राजन ताम्हाणे
l कलाकार : डॉ. गिरीश ओक, शिवानी रांगोळे, भारत जाधव

आपली प्रतिक्रिया द्या