राममंदिराबाबत कोर्टबाजी न करता थेट अध्यादेश काढा – खासदार संजय राऊत

12

सामना प्रतिनिधी । पुणे

एकीकडे राममंदिराचा निर्णय  कोर्टाकडून अपेक्षीत करत आहात. तर, दुसरीकडे राममंदिर होणारच अस म्हणताय. हे काय आहे? राममंदिर व्हायलाच पाहिजे. ते करण्यासाठी कोर्टबाजी न करता सरकारने थेट एक अध्यादेश काढावा. तसा अधिकारही सरकारला आहे, अशी स्पष्ट भुमिका शिवसेना नेते, विभागीय संपर्क नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडली. दरम्यान, तुम्हाला निवडणूकीसाठी २०१९ पर्यंत राममंदिराचा घोळ घालायचा आहे का? त्यासाठीच हे चाललं आहे का? अशी टिकाही त्यांनी भाजपवर केली.

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते. शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. निलम गोऱ्हे, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ , रमेश कोंडे आदी या वेळी उपस्थित होते.

राममंदिराच्या संपुर्ण प्रक्रियेत शिवसेना महत्वाची पार्टी होती. मी स्वत: पाच वेळा कमिशन समोर साक्षीदार म्हणून गेलो आहे. एकीकडे कोर्टाकडून निर्णय अपेक्षीत धरायचा. आणि दुसरीकडे राममंदिर होणारच अशी भुमीका घ्यायची. राममंदिर बांधायचे आहेच तर कोर्टबाजी न करता सरकारने थेट अध्यादेश काढावा. मात्र, हा घोळ निवडणूकीसाठी घालायचा आहे का? तस असेल तर परत एकदा तिथे गोंधळ होईल, असा इशाही खासदार राऊत यांनी या वेळी दिला.

गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रचाराबाबत विचारले असता, गुजरात निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सभा घेतात. छोट्या – छोट्या गोष्टी आणि भावनिकतेचे आवाहन करत मत मागतात. कारण, गुजरातचे विकास मॉडेल आता राहिलेले नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. खरे पाहता पंतप्रधानांनी एवढ्या खालच्या स्तराला यायला नाही पाहिजे. त्यांनी दिल्लीत बसून राजकारण करावे आणि पंतप्रधानपदाचा सन्मान राखावा, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारने जाहिरतींवर केलेल्या खर्चावरही खासदार संजय राऊत यांनी टिका केली. ते म्हणाले,  सरकार जाहिरातीशिवाय जनतेसमोर पोहचू शकले नाही. कर्जमुक्तीची घोषणा केल्याबरोबर लगेचच वारेमाप जहिराती सुरु केल्या. मात्र, अद्याप कर्जमाफी केली नाही. काळा पैशाच्याबाबतीतही तसेच केले. कामे केली नसल्याने जाहिरांतीवर तीन हजार कोटींचा खर्च करावा लागला आहे.

नाना पटोलेंचा राजीनामा हा सरकारविषयीचा उद्रेक
खासदार नाना पटोले यांनी मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्याची भूमिका मांडली. शिवसेना ज्या भुमीकेसाठी भांडत होती, तीच भुमीका पटोले हे आपल्या पक्षात मांडत होते. त्यांच्या राजिनाम्यातून भाजप सरकार विषयीचा उद्रेक दिसत आहे. विदर्भाची भावना काय आहे, हे त्यांच्या राजिनाम्यातून स्पष्ट होत आहे. विदर्भाला प्रस्थापितांविरोधात बंडाची मोठी परंपरा आहे. ही भुमीका पटोलेंनी पुढे नेली तर नक्कीच ते विदर्भसिंह ठरतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राहूल गांधी आता पुर्वीसारखे पप्पू राहिले नाहीत
राहूल गांधी आता पुर्वीसारखे पप्पू राहिले नाहीत, हे गुजरातमधील निवडणूक प्रचारावरून स्पष्ट होत आहे. ते आता नेते बनले आहेत. २०१४ च्या निवडणुकीवेळी राहुल गांधीचे भाषण लागले की लोक चॅनल बदलत होते. मात्र, आता नागरिक त्यांचे भाषण ऐकत आहेत. आधी वाटायचे राहूल गांधी पंतप्रधान होवू शकत नाही. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी नमूद कले.

आपली प्रतिक्रिया द्या