स्वप्न..

माधवी कुंटे

सुमित्राबाईंनी पेटी काढली तेव्हा वामनराव म्हणाले, ‘अगं ते नच सुंदरी करी कोपा वाजव बर! मी जरा गळा साफ करून घेतो’. तेव्हा सुमित्राबाई नुसत्याच हसल्या. मग म्हणाल्या, ‘काळी-४ लावू का?’ त्यांना माहीत होतं हे वामनरावांना फारसं जमायचं नाही. आपण स्वतः अलीकडे जात नाही. आवाज कापतो. नि हे म्हणजे तर बेसुरांचे बादशहा! पण उगाच आपल्या कसल्या तरी ओळी म्हणत बसायच्या! परवा तर ते ‘गीव्ह मी सम सनशाईन’ म्हणायला लागले. काहीतरीच आपलं! राजसी तिथेच गणितं सोडवत बसली होती. ती म्हणाली, ‘‘अज्जो, असं नाही काही म्हणायचं! मी शिकवते तुम्हाला, थांबा!’ मग पोरीनं काय आवाज लावलाय! बारा वर्षांचं सारं वय! पण त्यातल्या भावना… अगदी चपखल सुरांमधून पोहोचवल्या! यांनी पण अगदी हात जोडत म्हटलं, ‘राज, मी तुला गणित शिकवतो. त्या बदल्यात तू मला गाणं शिकव.’ त्यावर ती म्हणाली, ‘अज्जो, गाणं गणितासारखंच असतं. गणित प्लस कविता म्हणजे गाणं!’ सुमित्राबाईंनी सुरावट वाजवली त्यावर नुसतेच काही शब्द गुणगुणली… मग वामनराव नाटय़गीत म्हणायला लागल्यावर म्हणाली, ‘अज्जो मी खेळायला गेली की तुम्ही म्हणा गाणं, आधी मला खायला दे ग आजी.’

तिला लाडू नि थालीपीठ देताना सुमित्राबाईंच्या मनात आलं, आपण जी सुरावट वाजवत होतो ती हिच्या गळय़ातून हुबेहूब उतरत होती, पण जवळच राजूरकरबाईंकडे शिकायला जा म्हटलं तर साफ नाही म्हणाली. राजूरकरबाई आपल्या गुरुभगिनी. आताशा त्यांनाही फारस गाता येत नाही, पण त्यांची सून रेखा नामवंत गायिका आहे. तिच्याकडे रीतसर शिक्षण होईल. आपल्या मुला-सुनेनंही कितीदा सांगून पहिलंय, पण नाहीच म्हणते पट्टी! अखेर सून नमिता म्हणाली, ‘आई, तुम्हीच थोडा वेळ तिला घेऊन बसत जाल का? सुदैवानं तुमच्यासारखाच आवाज आहे. पण तिच्या मनानं काय घेतलंय कुणास ठाऊक! क्लासला जायचं नाहीच असं अगदी ठाम सांगितलं. काय आहे पोरीच्या मनात ते तरी समजायला हवं!

ती खेळायला गेल्यावर सुमित्राबाई आपल्या खोलीत आल्या तेव्हा त्यांनी वामनरावांजवळ हा विषय काढला.. त्या म्हणाल्या, ‘जे सहज येतं नि ज्यात गती असते ते करायला खरं तर आवडतं मुलांना, पण राजसीची आपली उलटी गंगाच वाहते आहे.’ वामनराव म्हणाले, ‘काहीतरी गुंता आहे तिच्या मनात एवढं खरं! बोलून बघू या.’ रात्रीच्या वेळी मग ती गोष्ट ऐकायला नेहमीप्रमाणे वामनरावांकडे आली… अलीकडे तीच त्यांना वाचून दाखवायची गोष्ट! सिंड्रेलाची गोष्ट वाचली तिनं तेव्हा वामनराव म्हणाले. बघ गुण आहे, पण परिस्थिती नाही अशी सिंड्रेला… आणि गाण्याचा गुण आहे. शिकण्याची परिस्थिती आहे पण…

‘अज्जो… मला आवडतं गाणं, पण माझ्या मैत्रीण मृणाल… तिचं काय झालं गाणं  शिकून सांगू तुम्हाला… ती क्लासला जायला लागली… लगेच वर्षभरात टीव्हीवरच्या त्या छोटे उस्ताद रिऑलिटी शोमध्ये तिला जायला लावलं तिच्या आईनं. पहिल्यांदा तिची निवड झाली. नंतर काही आठवडे, पुढे गेली आणि मग एका फेरीत बाद झाली. तिची आई खूप रडली. मृणाल मला म्हणाली, ‘मी आईचे स्वप्न पुरं करू शकले नाही. मला मरून जावंसं वाटतंय.’ रोज मधल्या सुट्टीत हेच बोलायची ती आज्जो! अगदी गंभीर झाली आणि मग आजारीच पडली… आज्जो. तुम्हीही असंच स्वप्न बघाल, मी नाही पुरं करू शकले तर…?

चष्मा काढून डोळे पुसत वामनराव म्हणाले, ‘नाही गं बेटा… तू आमची स्वप्ने पुरी करायला या जगात आली नाहीस सोनू! तू तुझी स्वप्ने पहा. छान गाणं शिक, गाण्यातला आनंद घे. तेवढय़ासाठीच शिक…’ सुमित्राबाईंनीही तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या लक्षात आलं… गुंता सुटत आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या