महिलेच्या बचावासाठी धावलेल्या खऱ्याखुऱ्या ‘हिरोला’ अटक, खुनाचा गुन्हा दाखल

महिलेच्या बचावासाठी धावलेल्या एका खऱ्याखुऱ्या हिरोला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. मैदा वेल भागात सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा थरारक प्रसंग घडला होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती अवघ्या 26 वर्षांची असून, ती 43 वर्षांच्या महिलेच्या बजावासाठी धावली होती. इतर सगळेजण बघ्याची भूमिका घेत असताना या माणसाने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याला कदाचित आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे.

लंडनमध्ये मंगळवारी सकाळी गजबजलेल्या रस्त्यावर एक भयानक घडना घडली. 43 वर्षांच्या महिलेवर एक जण एकामागोमाग एक असे वार करत असल्याचं अनेकांनी पाहिलं. वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेला मदत करण्याची अनेकांची इच्छा होती, मात्र आरोपीच्या हातातील चाकू पाहून पुढे जाण्याची कोणी हिम्मत करत नव्हता. काहींनी मारेकऱ्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. आपण हतबलपणे हे सगळं पाहात असल्याची कल्पना सहन न झाल्याने एका तरुणाने धावत त्याची गाडी गाठली आणि त्याने मारेकऱ्याच्या अंगावर घातली.

मारेकऱ्याच्या अंगावर गाडी घालत असताना पीडित महिलेलाही या गाडीने चिरडलं होतं. एका प्रत्यक्षदर्शीने डेली मेल या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की त्याने आणि इतरांनी गाडी उचलून बाजूला केली. गाडीच्या खाली जखमी महिलाही होती, तिला ओढून बाहेर काढण्यात आलं. या महिलेला कृत्रिम श्वासोछ्वास देण्याचा काहींनी प्रयत्न केला, मात्र चाकूने भोसकल्यानंतर झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मत्यू झाला. तिला भोसकून ठार मारणारा देखील गाडीच्या धडकेत ठार झाला असून या दोघांच्या हत्येचा ठपका, महिलेला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या युवकावर ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी या गाडीवाल्या तरुणाच्या धाडसीपणाचे कौतुक केले आहे. मुख्य पोलीस डिटेक्टीव्ह जिम ईस्टवूड यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले की गाडी चालवणाऱ्या तरुणाचा मारेकरी आणि पीडीत महिलेशी काही संबंध होता हे तपासण्याचं काम सध्या सुरू आहे.