पार्थ पवारांच्या चालकाचे अपहरण करून बेदम मारहाण

116

सामना ऑनलाईन, पाबळ

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडी चालकाचे मुंबईतून अपहरण करून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा घाटात बेशुद्धावस्थेत फेकून दिले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 ते 6 जुलै दरम्यान घडला.

मजोज ज्योतीराम सातपुते (वय-26, सध्या रा.सणसवाडी,ता.शिरूर.मूळ रा.वरुडा,ता.जि.धाराशिव) असे अपहरण झालेल्या चालकाचे नाव आहे. मनोज यानेच शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पार्थ पवार यांच्यासोबत चालक मनोज सातपुते मुंबईतील कुलाबा येथे गेला होत. 5 जुलै रोजी आमदार निवास इथे मनोज थांबला होता. खासगी कामानिमित्त तो संध्याकाळी आमदार निवासाबाहेर पडला. रात्री 8 वाजता कुलाबा बेस्ट डेपोजवळ एक लाल रंगाची ओमनी मोटार आली. ‘तू पार्थ पवार यांचा चालक आहे का ?’ अशी विचारणा केली. तसेच ‘आम्हाला पार्थ पवार यांना एक वस्तू द्यायची आहे,’ असा बनाव रचत त्याला मोटारीत बसवले.

6 जुलै रोजी पहाटे मनोज शुद्धीवर आला, त्यावेळी तो पारनेर तालुक्यातील सुपा घाटात रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते तर छाती आणि पायावर जखमा होत्या. मनोजचा मोबाईलही त्याच्याजवळ नव्हता. एका एसटीला हात करून तो सणसवाडी येथे पोहोचला. तेथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या