ड्रायव्हरलेस गाड्या आणि विमा

>> प्रसाद ताम्हनकर

ड्रायव्हरलेस अर्थात चालकविरहित गाडय़ांना जागतिक रस्ते वाहतुकीचे भविष्य म्हणून बघितले जात आहे. जगभरातील प्रमुख देशांमध्ये असलेली वाहतूक कोंडीची गंभीर समस्या, जगभरात रस्ते अपघातांचे वाढत चाललेले प्रमाण आणि प्रवासाच्या सुविधांची हेळसांड बघता वाहतूक क्षेत्रातील तज्ञांना हा ‘ड्रायव्हरलेस कार’चा फंडा फारच आवडून गेला होता.

जगभरातील मोठय़ा मोठय़ा उद्योजकांनी, तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर उत्पादक कंपन्यांनी या ‘ड्रायव्हरलेस कार’च्या उत्पादनासाठी स्वतःला झोकून देत मोठी गुंतवणूकदेखील केली. टेस्ला, अॅपल, फोर्ड, ऑडी, किया-हुंडई इत्यादी कंपन्यांनी या क्षेत्रात चांगली भरारी घेतली. यातील बऱ्याच कंपन्यांच्या ‘ड्रायव्हरलेस कार’च्या चाचण्यादेखील यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या आहेत. चीनसारख्या देशात तर या गाडय़ा रस्त्यावरदेखील उतरल्या आहेत.

‘ड्रायव्हरलेस कार’ ही संकल्पना प्रत्यक्षात जरी सुंदर वाटत असली तरी जसे जसे या गाडय़ांचे उत्पादन सुरू झाले, यांच्या चाचण्या सुरू झाल्या, तसे तसे काही अनपेक्षित प्रश्नदेखील उभे राहायला लागले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सुरक्षितता. ‘ड्रायव्हरलेस कार’ नियमांचे सातत्याने पालन करत, शिस्तशीर मार्गाने पळत राहिल्या, तरी दुर्दैवाने त्यांच्याकडून एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल? कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स -AI), मशीन लर्निंग, सेन्सर्स अशा विविध तंत्रज्ञानांच्या मदतीने रस्त्यावर सुरक्षित धावणाऱया या गाडीच्या तंत्रज्ञानालाच एखाद्या समाजविघातक हॅकरने हॅक केले तर? अशा हॅक केलेल्या गाडीला असुरक्षितपणे धावायला लावून एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा पोचवण्यात आली, मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले तर? ‘मास हॅकिंग’ अर्थात खूप मोठय़ा प्रमाणावर अनेक ‘ड्रायव्हरलेस कार’ हॅक करून, त्यांचा उपयोग विघातक घटनांसाठी करण्यात आला तर?

जगात आज कोणत्याही देशात अशा ‘ड्रायव्हरलेस कार’मुळे घडणाऱया अपघातांसाठी, त्याच्यामुळे होणाऱया आर्थिक नुकसानीसाठी, अपघाती मृत्यूसाठी अथवा वैयक्तिक शारीरिक इजेसाठी विम्याचे संरक्षण उपलब्ध नाही. हीच बाब वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांसाठी चिंता निर्माण करते आहे. ब्रिटनमधील वाहतूक सुरक्षा तज्ञांनी या समस्येवरील उपायासाठी पुढाकार घेतला असून राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारच्या एखाद्या नुकसानाची भरपाई देणारी संस्था उभारण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा संस्थेमुळे ग्राहकांना मानसिक आधार तर मिळेलच, पण अशा प्रकारच्या गाडय़ांचे उत्पादन करणाऱया उत्पादकांवरचा आर्थिक ताणदेखील हलका होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘ड्रायव्हरलेस कार’च्या जगातील प्रमुख देशांत विमा संरक्षणाची मागणी जोर पकडणार आहे हे निश्चित. जगातील प्रमुख विमा पुरवठा कंपन्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे, हे अजून तरी स्पष्टपणे आणि अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र ‘ड्रायव्हरलेस कार’ला मागे टाकत आता आपले तंत्रज्ञान ‘फ्लाइंग कार’ आणि ‘फ्लाइंग टॅक्सी’च्या दिशेने निघालेले आहे, हेदेखील लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. ‘ड्रायव्हरलेस कार’च्या विम्याच्या समस्येचे समाधान पुढे जाऊन ‘फ्लाइंग कार’साठीदेखील उपयोगी ठरेल याची शाश्वती नाही. अशा वेळी पुढील सर्व गोष्टींचा विचार करून या समस्येवरचा ठोस उपाय शोधायला लागणार आहे.

[email protected]