ठाण्यात फेरीवाल्यांच्या डोक्यावर आता ड्रोन भिरभिरणार

55

सामना ऑनलाईन, ठाणे

वारंवार कारवाईचा बडगा उगारुनही फेरीवाले हटता हटत नसल्याने ठाणे महापालिका प्रशासन सपशेल हतबल झाले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासन आता  ड्रोन कॅमेराची मदत घेणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक असे एकूण दहा ड्रोन लवकरच फेरीवाल्यांच्या डोक्यावर भिरभिरणार असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली जाणार आहे. त्यामुळे रस्ता व फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

ठाणे स्थानकापासून ते शहरातील प्रत्येक गल्ली महोल्ल्यात, रस्त्यापासून ते फुटपाथपर्यंत अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी आपली दुकाने पावलोपावली थाटली आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणानंतरही शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे असून नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथही रिकामे नाहीत. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात असली त्याचा परिणाम केवळ तेवढयापुरतीच मर्यादित असल्याचे थेट पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याही लक्षात आले आहे. कारवाईसाठी पालिकेचे पथक येण्याआधीच फेरीवाल्यांपर्यंत टीप पोहचत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या फेरीवाल्यांविरोधात सामान्य ठाणेकरांसोबतच आता व्यापाऱयांच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करुन आयुक्तांकडे फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत कारवाईच्याकेळी फेरीवाले पळून जात असतील तर त्यांच्यावर ड्रोन कॅमे-याने पाळत ठेवण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ज्या ठिकाणी फेरीवाल्यांचा सर्वात जास्त त्रास तिथे ड्रोनचा वापर करण्याच्या सुचना यावेळी बैठकीमध्ये देण्यात आले आहेत.

फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने ड्रोनची मदत घेण्याचे ठरवले असले तरी त्यासाठी त्यांना ४० ते ५० लाखांचा खर्च येणार आहे. ड्रोन, मनुष्यबळ आणि सिस्टमसेटअप अशी एकत्रित निविदा लवकरच काढण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रीयेवर अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याची नजर असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या