मराठवाड्याला वाचवा!

101
प्रातिनिधिक फोटो

मागच्या अडीच वर्षांत कर्ज आणि नापिकीमुळे मराठवाडय़ात २७०० हून अधिक शेतक-यांनी आपले जीवन संपवले. आता तर पाऊस गायब झाल्याने दुष्काळाचा राक्षस पुन्हा एकदा मराठवाडय़ावर चाल करून आला आहे. ऐन पावसाळय़ातच तो शेतक-यांचे प्राण घेतो आहे. नियम, कायदेकानून बाजूला ठेवून हे जीव कसे वाचवता येतील याचा विचार कोणी करेल काय?

दुष्काळ आता जणू मराठवाडय़ाच्या पाचवीलाच पुजला आहे. मागचे एक वर्ष कसेबसे सुखाचे गेले; मात्र यंदा पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या…’ असे म्हणण्याची वेळ निसर्गाने मराठवाडय़ावर आणली आहे.  पावसाअभावी दुस-यांदा पेरलेली पिकेही डोळय़ादेखत करपू लागल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱयांचा जीव कासावीस होतो आहे. पिकांनी टाकलेल्या माना बघून निराश झालेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वास्तविक यंदा पाऊसपाणी चांगले असेल, असा अंदाज हवामान खात्याने पावसाळय़ापूर्वीच वर्तवला होता. त्यामुळे शेतकरीवर्ग खुशीत होता. मागील चार-पाच वर्षांत सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे जो कर्जाचा डोंगर वाढला तो चांगले पीकपाणी झाले तर या वर्षी काही प्रमाणात तरी कमी होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र मराठवाडय़ातील शेतकऱयांच्या सुखाच्या या स्वप्नावरून निसर्गाने यंदाही नांगरच फिरवण्याचे ठरवलेले दिसत आहे. निम्मा पावसाळा संपला तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरण्याची कुठलीही चिन्हे अजून तरी दिसत नाहीत. जूनच्या पहिल्या आठवडय़ात जो पाऊस झाला तेवढेच काय ते समाधान. महिनाभर दडी मारलेला पाऊस जुलै महिन्यात आला तोही तुरळकच तालुक्यांत. जून, जुलै आणि ऑगस्टचे पहिले दहा दिवस अशा पावसाळय़ाच्या सरलेल्या सत्तर दिवसांत जेमतेम सव्वीस दिवसच पावसाच्या सरी कोसळल्या आणि उर्वरित ४४ दिवस कोरडेठाकच गेले. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद ही पिके तर हातची गेलीच शिवाय कापूस, मका, तूर ही पिकेही आता शेवटच्या घटका मोजत आहेत.

खरीप हंगामाचा पुरताच विस्कोट

झाल्याने हतबल शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत आहेत. परभणी जिल्हय़ाच्या पूर्णा तालुक्यातील अनिल शिंदे या तरुण शेतकऱयाने राखीपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गळफास घेतला. सुकलेली पिके पाहून अनिल अस्वस्थ होता. राखी बांधण्याचा अधिकार सोडून जात असल्याबद्दल बहिणीची माफी मागून त्याने जगाचा निरोप घेतला. पाथरी तालुक्याच्या बाबूलतारा येथील शिवाजी जोगदंड या शेतकऱयानेदेखील करपलेली पिके पाहून शेतातच विष घेऊन आत्महत्या केली. हिंगोली जिल्हय़ाच्या बोरखडी तांडा येथील श्रीरंग राठोड या शेतकऱयानेही पेरणी वाया गेल्याने आपले आयुष्य संपवले. पाथरी तालुक्यातील निवळी येथे तर वाळलेली पिके पाहून विठ्ठलराव लिपने या शेतकऱयाला शेतातच हार्टअटॅक आला. याच तालुक्यातील सारिका झुटे या सतरा वर्षांच्या मुलीने शेतातील सुकलेली पिके पाहून आपले वडील आत्महत्या करतील या भीतीने स्वतःची जीवनयात्रा संपवली. जेमतेम आठवडय़ापूर्वीच सारिकाच्या काकांनी पावसाअभावी पिके सुकल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली होती. काकांनी जे केले ते आपल्या वडिलांनी केले तर… या भयाने सारिकाला ग्रासले होते. मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्जच अजून फिटलेले नाही. आताही पावसाने दगा दिला. वडिलांची मेहनत वाया गेली. त्यात पुन्हा आपल्या लग्नाचा ताण वडिलांवर यायला नको म्हणून तिनेही काकांच्या पावलावर पाऊल टाकून मृत्यूला जवळ केले. ‘पप्पा, भाऊंप्रमाणे (काका) तुम्हीही कंटाळून आत्महत्या करू नये म्हणून मीच माझे जीवन संपवते’, असे

हृदयद्रावक पत्र सारिकाने

आपल्या वडिलांना लिहिले आहे. या सगळय़ा घटना केवळ मागील आठवडाभरातील आहेत. ढग येतात आणि वाऱयाबरोबर उडून जातात. पिके जगवायला पाऊस पडत नाही आणि उगवलेली पिके जाळून टाकायला रखरखीत ऊन मात्र पडते आहे. धाराशीव जिल्हय़ामध्ये जुलै महिन्यात ४२.९ इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. दुष्काळाचे संकट मराठवाडय़ाचा घास घेण्यासाठी टपून बसले आहे, असेच भेसूर चित्र सर्वत्र दिसते आहे. त्यातून मराठवाडय़ाला वाचवण्यासाठी आतापासूनच पावले टाकायला हवीत. कर्जमाफीसाठी शेतकऱयांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने ४० लाख शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा ८९ लाख शेतकऱयांना लाभ होईल, असे सरकारने जाहीर केले, मात्र नियमांच्या किचकट जंजाळात सापडलेल्या कर्जमाफीचा अद्याप एकाही शेतकऱयाला लाभ झालेला नाही, हे वास्तव आहे. २४ जून रोजी कर्जमाफीची घोषणा झाली त्याला आता ४५ दिवस उलटले. या ४५ दिवसांतच मराठवाडय़ात तब्बल १०१ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. या बळींना जबाबदार कोण? मागच्या अडीच वर्षांत कर्ज आणि नापिकीमुळे मराठवाडय़ात २७०० हून अधिक शेतकऱयांनी आपले जीवन संपवले. आता याही वर्षी पाऊस गायब झाल्याने दुष्काळाचा राक्षस पुन्हा एकदा मराठवाडय़ावर चाल करून येत आहे. ऐन पावसाळय़ातच तो शेतकऱयांचे प्राण घेतो आहे. नियम, कायदेकानून बाजूला ठेवून हे जीव कसे वाचवता येतील याचा विचार कोणी करेल काय?

आपली प्रतिक्रिया द्या