जेलमधून पळण्यासाठी मुलगी बनला, पण घाबरल्याने डाव फसला

1608

सामना ऑनलाईन । रिओ दे जेनेरिओ

जेलमधून पळण्यासाठी विविध शकला लढवतानाचे अनेकदा आपण चित्रपटांत पाहतो, वृत्तपत्रांमधून वाचतो. दुसऱ्या व्यक्तीसारखा हुबेहुब पेहराव करून चकमा देण्याचा प्रयत्न चोरटे करतात. तशीच एक घटना ब्राझीलच्या रिओ दे जेनेरिओतील एका तुरुंगात घडली आहे. अटकेत असलेल्या ड्रगडीलरने तुरुंगातून पळून जाण्यासाठी चक्क आपल्या स्वतःच्या मुलीचे हुबेहुब रूप घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तो पकडला गेला.

मुलीसारखे हुबेहुब रुप घेऊन तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच नाव ‘क्लाउविनो द सिल्वा’ उर्फ शॉर्टी आहे. शॉर्टी एक ड्रगडीलर असून त्याला 73 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शनिवारी शॉर्टीला भेटण्यासाठी तुरुंगात त्याची मुलगी आली असताना हा प्रकार घडला. शॉर्टीने तुरुंगात भेटायला आलेल्या आपल्या 19 वर्षीय मुलीसारखा हुबेहुब गेटअप केला व तुरुंगातून पसार होण्याचा प्रयत्न केला. पसार होण्यासाठी शॉर्टीने सिलिकॉन मास्क, केसांचा वीग, जीन्स आणि गुलाबी रंगाच टी-शर्ट असा पेहराव करून आपल्या मुलीसारख हुबेहुब दिसण्याचा प्रयत्न केला होता. मुलीला तुरुंगातच सोडून फरार होण्याचा त्याचा डाव होता. पण असं जोखमीचं काम करताना तो घाबरला. तपासणी दरम्यान त्याच्यावर चौकीदारांना शंका आली आणि तो तावडीत सापडला.

शॉर्टीला जेलमध्ये हा पेहराव एखाद्या गर्भवती महिलेनी पोहोचवला असावा असा अंदाज बांधला जात आहे. कारण तुरुंगात प्रवेश करताना तपासणीत गर्भवती महिलांनाच सवलत दिली जाते. दरम्यान, शॉर्टीला तुरुंगातून पळून जाण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशय असल्यामुळे त्याच्या 19 वर्षीय मुलीसोबत अन्य 7 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या