बॉलीवूड ड्रग्ज केस – गोरेगावात NCB पथकावर हल्ला, संचालक समीर वानखेडेंसह तीन अधिकारी जखमी

अमली पदार्थविरोधी (एनसीबी) पथकावर 50 ते 60 जणांच्या जमावाने दगड व काठीने जीवघेणा हल्ला केला. यात एनसीबी पथकाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यासह तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. गोरेगावमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. बॉलीवूडच्या ड्रग्ज रॅकेटचा तपास सुरू असताना हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

एनसीबीचे संचालक वानखेडे यांच्यासह अधीक्षक व्ही. व्ही. सिंग, विश्वनाथ तिवारी, पी. रेड्डी आणि पी. डी. मोरे या पाच जणांचे पथक ड्रग्ज पेडलर पॅरी मॅण्डिसला पकडण्यासाठी गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळील भगतसिंग नगरात गेले होते. मॅण्डिसला पकडताच त्याच्या साथीदारांसह 50 ते 60 जणांनी एनसीबी पथकावर दगड-काठीने हल्ला सुरू केला.

घटनेची खबर मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी आले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. हल्ल्यात वानखेडे यांच्यासह विश्वविजय सिंह व शिवा रेड्डी यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी ड्रग्ज तस्कर मॅण्डिससह त्याचे साथीदार विपुल आग्रे, युसूफ शेख आणि अमीन अब्दुल यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अंमली पदार्थांचा (एलएसडी) मोठा साठा जप्त केला आहे. हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी परिसरात छापेमारी केली. हल्लेखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

एनसीबीने मागील महिनाभरापासून बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी छाप्यांचा सपाटा लावला आहे. यादरम्यान काही बडय़ा ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतले, तर बॉलीवूडमधील नशेबाज तारे-तारकांचे चेहरे समोर आले. नुकतीच कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष या दोघांना अटक झाली. त्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा तपास केला जात आहे.

कोण आहेत समीर वानखेडे?

वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. हिंदुस्थानी महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर मुंबई विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यांना ड्रग्ज प्रकरणांतील कारवाईमध्ये तज्ञ मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दोन वर्षांत तब्बल 17 हजार कोटी रुपयांच्या नशा व ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला गेला. अलीकडेच ते डीआरआयमधून एनसीबीमध्ये दाखल झाले आहेत.

पॅरी मॅण्डिस हा बॉलीवूडमध्ये ड्रग्ज पुरवणाऱया टोळीचा सर्वात ऑक्टिव्ह मेंबर मानला जातो. अनेक प्रसिद्ध कलाकारांशी त्याचे संबंध आहेत. शुक्रवारी पकडलेल्या दोन ड्रग्ज वितरकांच्या तोंडून त्याचे नाव पुढे आले होते. आता त्याच्या चौकशीतून बॉलीवूडमधील आणखी कलाकारांच्या नावांचा गौप्यस्फोट होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या