देशातील 63 टक्के नागरिकांचा कॅन्सर, मधुमेह, हृदयरोगाने मृत्यू, निविदा प्रक्रियेचा रुग्णांना फटका

बदलती जीवनशैली, व्यसनाधीनता, बैठी कामे, व्यायामाची कमतरता अशा असंख्य कारणांमुळे देशासह राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. राज्यात कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग अशा असंसर्गजन्य आजाराने मृत्यू पडणाऱयांचे प्रमाण 63 टक्क्यांवर गेले आहे तर कॅन्सरने मृत्युमुखी पडणाऱयांचे प्रमाण 9 टक्के असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्य केले आहे. राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढत असतानाही हाफकीनमध्ये औषध खरेदी प्रक्रियेला विलंब होत असल्याचे पुढे आले आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण योजनेअंतर्गत कर्करोग, मधुमेह, हृदयरोग पक्षाघात प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम राज्याच्या 34 जिह्यांमध्ये राबवला जात आहे. सध्याच्या दिवसात असंसर्गजन्य आजारांची झपाटय़ाने वाढ होत असून 63 टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य आजारामुळे होतात त्यापैकी कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 9 टक्के आहे असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. राज्यातल्या गरजू आणि गरीब रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार होतात. त्यासाठी राज्यातल्या आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक असलेली औषध व उपकरणांची खरेदी हाफकीन महामंडळाकडून करण्याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

रुग्णांना आवश्यक असलेली सर्व औषधे खरेदी करण्याबाबत हाफकीन महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबवून औषधे उपलब्ध करून घेणे बंधनकारक आहे, पण कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची औषधे खरेदी निविदा प्रक्रिया राबवून उपलब्ध होण्यास हाफकीनमधून विलंब होतो. कॅन्सर रुग्णावर वेळत किमोथेरेपीचे उपचार होणे आवश्यक आहे. किमोथेरेपीची औषधे वेळेत पुरवल्यास रुग्णांना वेदनेपासून काही अंशी आराम मिळतो, मात्र अशी औषधे वेळेत उपलब्ध न झाल्यास कॅन्सर रुग्णांना अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात.

राज्यात वाढत असलेली कॅन्सर रुग्णांची संख्या लक्षात घेता या रुग्णांना वेळेवर किमोथेरेपीची औषधे उपलब्ध होण्यासाठी 2022-2023 ते 2023-24 च्या मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडय़ामध्ये तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. या अनुदानातून कर्करोग रुग्णांना दिलासा देण्यासाठी एक अपवादात्मक विशेष बाब म्हणून हाफकीनकडून निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करून औषध प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी टाटा रुग्णालयाने निश्चित केलेल्या पुरवठादारांकडून खरेदी करण्यास आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे हाफकीनसारखी संस्था असतानाही निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे टाटा रुग्णालयाकडून औषधे घेण्याची वेळ आली आहे.