काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात आल्यावर आतापर्यंत झोपेत असलेल्या गुजरात एटीएसची पळापळ सुरू झाली आहे. याच केसमधील टोळीचा माग काढत गुजरात एटीएस आणि दिल्लीच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने एका संयुक्त कारवाईत भोपाळजवळील एका फॅक्टरीतून 1814 कोटी रुपये किंमतीचे मेफेड्रोन तथा एमडीच्या नशा आणणाऱ्या गोळ्या जप्त केल्या.
गुजरातप्रमाणेच मोठा ड्रग साठा जप्त करण्यात आलेले मध्य प्रदेश हे राज्यही भाजपशासित आहे. यामुळे भाजपशासित राज्यांत ड्रग तस्करांना मोकळे रान मिळत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी सात-आठ महिन्यांपूर्वी भोपाळजवळील बागरोडा औद्योगिक वसाहतीत ही फॅक्टरी भाड्याने घेऊन एमडी बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. या गोळ्यांसाठी लागणारा कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे.
अडीच हजार चौरस यार्डांच्या एका औद्योगिक शेडमध्ये एमडी बनवण्याची फॅक्टरीच या दोघांनी उघडली होती. विनानंबर प्लेटच्या वाहनांमधून आलेल्या गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी, एनसीबीच्या सहकार्याने हा छापा टाकला. या दोघांनी या शेडमध्ये प्रतिबंधित सिंथेटिक औषध मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल आणि उपकरणे ठेवली होती. गेले तीन ते चार महिने येथे दररोज 25 किलो एमडी गोळ्या बनवल्या जात होत्या.
आरोपींवर मुंबईतही कारवाई
या प्रकरणी प्रमुख संशयित सन्याल प्रकाश बने आणि अमित चतुर्वेदी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी बने याला 2017 मध्ये मुंबईतील आंबोली येथे अशाच एमडी ड्रग प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. पाच वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर त्याने अमित चतुर्वेदी यांच्याशी हातमिळवणी करून पुन्हा हा एमडी निर्मितीचा अनधिकृत व्यवसाय सुरू केला.
दिल्लीत 10 कोटींचे कोकेन जप्त
दिल्लीत 2 ऑक्टोबरला जप्त करण्यात आलेल्या 5600 कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पोलिसांनी अमृतसर येथून 10 कोटी किंमतीचे कोकेन जप्त केले आहे. या छाप्यात देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.