ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ड्रामा; जेलमधून रुग्णालयात जाण्यासाठी केला होता बनाव

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे काही जुने व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामधून तो पोलिसांसमोर कशाप्रकारे नाटक करायचा हे उघड होत आहे. ललित याला ताब्यात घेतल्यापासून त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत. त्याच सोबत ड्रग प्रकरणात ललित पाटील याला मदत करणाऱ्यात अनेकांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी त्याच्या दोन मैत्रिणींसह आतापर्यंत 15 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून विविध गोष्टी उघड होत आहेत. ललित पाटील याला 2019 मध्ये अटकेत टाकण्यात आले होते. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता.

तेव्हाच्या एक सीसीटीव्ही फूटेजमध्ये ललित पाटील आजारपणाचे नाटक करत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ 2020 मधील असल्याचं सांगितलं जात आहे. ललित पाटीलला ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला हिंजवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. हिंजवडी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ललितनं आजारपणाचं नाटक केलं. पोलीस स्टेशनच्या जिन्यावरून उतरताना आपण पडलो असं त्यानं भासवल्याचं आता उघड होत आहे.

ललितच्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील विविध भागातून ड्रग्ज तस्करीची प्रकरणं बाहेर येऊ लागली आहेत.