अखेर चतूर आरोपी सापडलाच…

16

सामना ऑनलाईन । ठाणे

एखादा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला तर तो पोलिसांपासून दूर लपण्याच प्रयत्न करतो. मात्र ठाण्यात एक आरोपी पोलीस स्टेशनमधून पळून गेला अन् लपला कुठे तर ठाणे पोलीस आयुक्तालयात. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर शोधून पुन्हा अटक केली. मलिक मौला असं या आरोपीचं नाव आहे.

ठाण्याच्या कळवा परिसरात एका बस ड्रायव्हरने दारूच्या नशेत रस्त्यावरील एका अलिशान कारला धडक दिली आणि ती कार दुसऱ्या कारवर जाऊन धडकली. या धडकेत दोन्ही कारचं मोठं नूकसान झालं. त्यानंतर संतापलेल्या कार मालकांनी बस ड्रायव्हरशी भांडायला सुरूवात केली. दरम्यान या प्रकारामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दारूच्या नशेत असलेल्या बस ड्राईव्हरला कळवा पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर आरोपीविरोधात पोलीस गुन्हा नोंदवत होते. त्यावेळी पोलिसांचं लक्ष नाही हे पाहून संधी साधत बस ड्रायव्हरने त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला धक्का मारत पोलीस स्टेशनमधून पळ काढला. पोलीसांनीही त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पोलीस मागावर आहेत हे पाहून आरोपी नकळत पोलीस आयुक्तालयात घुसला आणि आयुक्तालयाच्या लगत असलेल्या झाडीत घुसला. त्याठिकाणी असलेल्या बंद पडलेल्या गाडीत जाऊन तो लपला. पोलिसांनी बराच वेळ त्याचा शोध घेतला मात्र तो काही सापडला नाही. पोलीस निघून गेले असा समज झाल्याने आरोपी आयुक्तालयाच्या भींतीवरून पळून जात असतांना पोलिसांनी त्याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या