मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

18

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

नागपूर-शिर्डी प्रवासादरम्यान चालकाने भरधाव वेगाने बस चालवल्याने अपघाताच्या भीतीने प्रवाशांचा थरकाप उडाला. चालक मद्यधुंद असल्याच्या संशयावरून संतप्त प्रवाशांनी चालकास दम देत बस थेट ठाण्यात नेण्यास भाग पाडले. मात्र प्रवाशांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने बस पुन्हा शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. नागपूर येथील राजलक्ष्मी ट्रव्हल्स एजन्सीची बस रविवारी रात्री नागपूरहून शिर्डी साठी निघाली होती.

सदरची बस ही अमरावतीला आल्यानंतर त्या ठिकाणी चालक बदलला. त्यानंतर दुसरा चालक बस चालवत होता. सदर बसही  बुलढाण्याजवळ येताच बसचालकाने रात्रीच्यावेळी प्रवाशी झोपेत असताना पळवली. तसेच अनेक ठिकाणी बस चालकाने अन्य वाहनांना ओव्हरटेक करत बस पुढे काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान बस एका ट्रकला चाटून  पुढे निघाली. अपघाताच्या भीतीने प्रवाशी भयभीत झाले होते.

प्रवाशांनी चालकास समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकावर परिणाम होत नसल्याचे पाहुन प्रवाशांनी बस चिकलठाण्याजवळ येताच  चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर उभे करण्यास भाग पाडले. दरम्यान चालकाने बस चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर  उभी केली आणि प्रवाशी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आत गेले. यावेळी त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने हद्दीचा वाद उकरत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात  जाण्याचा सल्ला दिला. चालकाने बस थेट सिडको पोलीस ठाण्यात नेली. त्या ठिकाणी नेल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी प्रवाशांना मार लागल्यास वैद्यकीय  तपासणी करून औषधोपचार करण्यासाठी शासकीय  रूग्णालयात पाठविण्याची तयारी सुरु करताच प्रवाशांनी जाण्याची घाई असल्यामुळे तक्रार देण्यासाठी नकार दिल्याने शेवटी त्याच बसने  प्रवाशांना पुढील प्रवासाला निघावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या