दुबई एअरपोर्टवरती बायोमेट्रिक पॅसेंजर जर्नी 

कोविड-19 अर्थात कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी आणि त्याच्यापासून बचावासाठी जगभरात विविध क्षेत्रांत अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आणि अजूनही येत आहेत. कोरोनाच्या धोक्याशी लढतच आता आपल्याला आपल्या रोजच्या कामांना सुरुवातदेखील करायला लागलेली आहे. कारण जग थांबून उपयोग नाही. या दैनंदिन कामाचाच एक अनिवार्य भाग म्हणजे प्रवास होय. मग हा प्रवास घर ते ऑफिस असेल किंवा एका राज्यातून दुसऱया राज्यात किंवा अगदी परदेश प्रवासदेखील असू शकतो. हा प्रत्येक प्रवास शक्यतो गर्दी टाळून अर्थात ‘नो कॉन्टॅक्ट जर्नी’ या प्रकारात असावा यासाठी प्रत्येक देशातील शहरे प्रयत्नशील आहेत.

बाहेरून येणाऱया प्रवाशांची तपासणी हादेखील यातला एक महत्त्वाचा भाग आहे, जो बरेचदा वेळखाऊ आणि गर्दी वाढवणारा असतो. दुबईसारख्या सतत गजबजलेल्या एअरपोर्टसाठी आता तेथील सरकारने भविष्यातील तंत्रज्ञानाचा अर्थात ‘बायोमेट्रिक आयडेंटीफिकेशन’ चा वापर करून ही गर्दी टाळण्यासाठी व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ‘बायोमेट्रिक पॅसेंजर जर्नी’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. त्यासाठी एक स्मार्ट टनेल (बोगदा) बनवण्यात आले असून 122 स्मार्ट गेट (दरवाजे)देखील उभे करण्यात आले आहेत.

प्रवाशाने ‘चेक इन’ काऊंटरपाशी हजेरी लावताच त्याच्या चेहऱयाचे व डोळ्यातील बुबुळांची ‘फेस रेकग्नेशन’ तंत्रज्ञानाद्वारे नोंदणी होऊन त्यांची ओळख पटवली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रत्येक स्मार्ट दरवाजावरती लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने या चेहऱयाची व बुबुळांची तपासणी होऊन, ओळख पटताच हे दरवाजे आपोआप उघडले जाणार आहेत. या सगळ्यासाठी अवघ्या 5 ते 9 सेकंदांचा वेळ लागणार आहे हे विशेष. अर्थात या सर्व दरवाजांवरती प्रत्येकवेळी पासपोर्ट दाखवत ओळख पटवण्याची गरज नसली तरी प्रवाशांना आपला पासपोर्ट जवळ बाळगायलाच लागणार आहे. या तंत्रज्ञानाची प्रवाशांना सक्ती करण्यात येणार नसून ज्या प्रवाशांची इच्छा नसेल ते प्रवासी आपल्या पासपोर्टचा वापर करून चेक-इन सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या