Iran War – दुबईच्या मध्यवर्ती भागात स्फोटांचे आवाज; इराणकडून ड्रोन हल्ला, शहरात धुराचे लोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता आखाती देशांपर्यंत पोहोचला आहे. दुबईच्या मध्यवर्ती भागात (डाउनटाऊन) गुरुवारी स्फोटांचे आवाज ऐकू आले. निवासी भागातून धुराचे लोट निघताना दिसले आहेत. इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांविरुद्ध सुरू ठेवलेल्या मोहिमेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

दुबईतील ‘अल बदा’ (Al Bada’a) या निवासी परिसरात एकापाठोपाठ एक स्फोट झाले. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने या स्फोटांना दुजोरा दिला आहे. परिसरातून धुराचे लोट आकाशात जाताना दिसले. मात्र, थोड्याच वेळात हा धूर विरला.

प्रशासन अल बदा परिसरात झालेल्या एका ‘छोट्या ड्रोन घटने’वर (Minor Drone Incident) कारवाई करत आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती दुबई सरकारच्या मीडिया ऑफिसने ‘X’ वर पोस्ट करत दिली आहे.

गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीपासून मध्य पूर्वेत सुरू झालेल्या युद्धामुळे आखाती देशांना मोठा फटका बसला आहे. इराणने केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत या भागात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ अमेरिकन आणि ११ इतर नागरिकांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ इराणने आता आपला मोर्चा आखाती देशांकडे वळवल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.