पाकिस्तानी माती आणि अमेरिकन गवत वापरून सजलेय दुबईचे शारजा मैदान, यूएईच्या वाळवंटातील 3 स्टेडियम अशीच साकारण्याचा पराक्रम

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) ओसाड वाळवंटात जिथे पूर्वी गवताची काडीही उगवायची नाही त्या बंजर जमिनीत हिरवेगार क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा पराक्रम जगातील तंत्रज्ञांनी यशस्वी केला आहे. वर्ष 1981, यूएईचे शारजा मैदान. परंपरागत प्रतिस्पर्धी  हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट  संघ समोरासमोर होते, पण मैदानाच्या नावावर केवळ ओसाड जमीन, काँक्रीटची खेळपट्टी आणि सिंथेटिक सरफेस. प्रेक्षकांना बसण्यासाठी मचान तयार करण्यात आले होते, पण गेल्या काही वर्षांत त्याच जागेवर हिरवीगार क्रिकेट मैदाने बहरली आहेत. वाळवंटातील ही मरुभूमी जागतिक क्रिकेटचे एक प्रमुख त्रयस्थ केंद्र म्हणून दिमाखात उभे राहिले आहे. याच शारजा मैदानावर आशियाई क्रिकेटमधील वाघ आशिया चषक जेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत.

दुबईतील या स्टेडियमचा इतिहास मात्र रंजक असाच आहे. यूएईमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधणे अवघड काम होते. विशेषतः दोन कारणांमुळे – एक तेथे उष्णता आहे आणि दुसरे वाळवंट असल्यामुळे तेथे स्टेडियम बांधण्यासाठी जागाच नव्हती. यासाठी बरेच संशोधन झाले आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिनाब आणि रावी नदीच्या दरम्यान असलेल्या गुजरानवाला जिह्यातील नंदीपूर भागातून माती आणण्यात आली. दोन नद्यांनी वेढलेल्या या भागातील सुपीक जमिनीत 66 टक्के चिकण माती आहे. या मातीबद्दल ऑस्ट्रेलियन प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आले तेव्हा असे आढळून आले की, ही माती ऑस्ट्रेलियाच्या मातीशी साधर्म्य असलेली आहे.

1982 ला उभारले गेले शारजा

1982  मध्ये शारजामध्ये यूएईचे पहिले क्रिकेट स्टेडियम बांधले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 1984  मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. यानंतर 2004  मध्ये अबुधाबी, यूएई  आणि 2009 मध्ये दुबई येथे आणखी दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार झाले. या दोन स्टेडियमची खेळपट्टी आणि मैदाने बनवण्यासाठीही शारजा तंत्राचाच  वापर करण्यात आला आहे. केवळ प्रदर्शनीय असलेला शारजाचा पहिला सामना पाहण्यासाठी लोक येतील असे यूएईच्या क्रिकेट आयोजकांनाही वाटले नव्हते. मात्र  8  ते 10  हजार प्रेक्षक प्रथमच तेथे पोहोचले. या सामन्याच्या यशाने यूएईमध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेचा पाया रचला गेला. विशेष म्हणजे तेव्हा यूएईचा स्वतःचा संघही नव्हता. वर्षभरानंतर त्या ओसाड जमिनीवर हिरवेगार क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले.