जम्मू कश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कलम 370 रद्द केले : नरेंद्र मोदी

989

जम्मू कश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळा पडला होता. ही कोंडी फोडून जम्मू कश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कलम 370 रद्द केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. राज्य वेगळे पडल्याने तेथील युवक दिशाहीन झाले, भरकटले आणि हिंसाचार आणि दहशतवादाच्या मार्गावर गेले. हे रोखण्यासाठी लोकशाही, पारदर्शी आणि संविधानिक पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला. कलम 370 ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तीन देशांच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली. काही व्यक्तींनी स्वार्थासाठी जम्मू कश्मीरला विकासापासून लांब ठेवले असा आरोपही त्यांनी केला.

आता कश्मीरमधील युवकांना आम्ही दिशाहीन होऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिंदुस्थानने घेतलेल्या निर्णयाला संयुक्त अरब अमिरातने दिलेल्या पाठिंब्याबाबत मोदी यांनी समाधान व्यक्त केले. काळाची गरज ओळखून अमिरातने दर्शवलेला पाठिंबा महत्वाचा असल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी अबूधाबीमध्ये शहजादे शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली. कलम 370 चा निर्णय हिंदुस्थानचा अंतर्गत निर्णय असून या निर्णयामुळे जम्मू कश्मीरचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबाबत मोदी यांनी नाहयान यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या