मुसळधार पावसामुळे फुणगूस, माखजन बाजारपेठेला पुराचा धोका वाढला

गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराचे पाणी सलग तिसऱ्या दिवशी वाढत असून काही घरांमध्ये पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठांमधील काही घरे आणि दुकाने यांना पुराचा फटका बसला आहे. कासे शिरंबे मार्गावर झाड कोसळले.

माखजन परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले असून रात्री कासे शिरंबे – पुऱ्ये मार्गावर दरड कोसळली. यामुळे दुर्गम भागाचा माखजनशी असणारा संपर्क तुटला. आठ तासांच्या अथक प्रयत्नांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आणि वाहतूक सुरळीत झाली.

माखजन आरवली परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गडनदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे आज रात्री कासे शिरंबे – पुऱ्ये मार्गावर दरड कोसळली. यामुळे माखजन शिरंबे – पुऱ्ये मार्गावरचे दळणवळण ठप्प झाले. एस. टी. वाहतूक खोळंबली. यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांचे हाल झाले. सोमवारी बस फेऱ्यांवर परिणाम मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस फेऱ्या थांबवण्यात आल्याने शाळेत आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे गैरसोय झाली होती तसेच विद्यार्थी संख्येवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.