
शेती तुकड्या तुकड्यांची झाल्याने उत्पादन खर्च वाढतोय त्यामुळे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. परिणामी कमी शेतीमध्ये घरातील गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि मग शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. त्यांच्या मनात हा विचारच येऊ नये, यासाठी ठोस धोरण करायला हवे. लोकप्रतिनिधींचा नादाणपणा आहे की, ते धोरणासाठी अर्थसंकल्पात काहीच करत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
रविवारी सकाळी सुमंत मुळगावकर सभागृहात विनायक हेगाणा यांनी लिहिलेले ‘शेतकरी आत्महत्या – शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगासे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, लोकमतचे संपादक संजय आवटे, आमदार कैलास पाटील, शांतीवन संस्थेच्या कावेरी दीपक नागरगोजे, अविनाश मोरे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेट्टी म्हणाले की, लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, मात्र शेती कमी होत आहे. शेती कमी असल्यास त्यामध्ये उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. कमी शेती असणाऱ्यांना ही खतं परवडत नाहीत. त्यामुळे उत्पादनात तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार येऊ नये म्हणून जोडधंदा शिकवायला हवा. ज्वारी विकण्यापेक्षा त्याचे पीठ तयार करणे, हरभऱ्यापासून बेसन व त्यापासून पापडी तयार करून विकणे असे उद्योग त्यांना जमल्यास शेतकरी सधन होऊ शकतो.’’