किटकनाशकाच्या फवारणीमुळे विषबाधा, ८ शेतकऱ्यांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । यवतमाळ

यवतमाळ जिल्हयातील मारेगाव, वणी, पांढरकवडा, पुसद, आर्णी व महागाव या तालुक्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात किटकनाशक फवारताना विषबाधा झाल्याने ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ शेतमजुरांची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या ३१५ रुग्णांवर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या घटना घडल्या आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटताच खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे.

मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तर अनेक रुग्णांनी खासगीत उपचार करून घेतले आहे. तर काहींनी चंद्रपूर, पुसद, वणी, हिंगणघाट, सेवाग्राम, आर्णी येथील रुग्णालयात उपचार करून घेतले आहेत. यातील काहीजणांची दृष्टीच गेल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. उपासमार झालेल्या शेतकऱ्यांनी या घटनेचा धसका घेतला असून तक्रार करावयासही कोणी पुढे आलेले नाही.

दरम्यान बुधवारी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. व्यवस्थित उपचार होत नसल्याचा त्याने आरोप केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या