मोदींच्या सभेमुळे चाकरमान्यांचे आज मेगा हाल

ठाणे येथील घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानात उद्या होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे चाकरमान्यांचे मेगा हाल होणार आहेत. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महापालिकांना टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने 300, ठाणे महापालिकेने 250, मीरा-भाईंदर महापालिकेने 125 आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने 79 बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेण्यासाठी वळवल्या आहेत. प्रत्येक महापालिकेच्या परिवहन सेवेतील निम्म्यापेक्षा जास्त बसेस उद्या पंतप्रधानांच्या सभेला जाणार असल्याने प्रत्यक्ष रस्त्यावर फार कमी बसेस धावणार आहेत.

ठाणे
महापालिकेच्या परिवहन सेवेत (टीएमटी) एकूण 400 बसेस आहेत. त्यापैकी टीएमटी प्रशासनाने 250 बसेस पंतप्रधानांच्या सभेसाठी वळवल्या आहेत. याच बसेसबरोबर टीएमटीने आणखी 50 खासगी बसेसची व्यवस्थाही महिलांसाठी केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने बसेस कार्यक्रमासाठी जाणार असल्याने शहरात विविध बस मार्गावर फक्त दीडशे बसेस धावणार आहेत. त्याचा सर्वाधिक फटका ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील सर्वच बस थांब्यांवर नेहमी जत्रेप्रमाणे गदर्दी असते. उद्या अडीचशे बसेस रस्त्यावरून गायब होणार असल्याने या गर्दीत मोठी वाढ होणार आहे.

नवी मुंबई
महापालिका परिवहन सेवेत (एनएमएमटी) एकूण 606 बसेस आहेत. त्यापैकी सुमारे 567 बसेस या दररोज रस्त्यावर उतरवल्या जातात. या बसेस शहरात आणि आसपासच्या शहरात सुमारे 74 बसमार्गावर प्रवाशांची सेवा करतात. एनएमएमटीमधून दररोज सुमारे 1 लाख 80 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र एनएमएमटी प्रशासनाने उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तब्बल 300 बसेस वळवल्या आहेत. त्यामुळे 1 लाख 80 हजार प्रवाशांचा भार उद्या फक्त दीडशे बसेसवर येणार आहे. परिणामी नवी मुंबईतील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मीरा-भाईंदर
महापालिकेच्या 125 बसेस पंतप्रधानाच्या सभेसाठी वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांचेही मोठे हाल होणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 2 ते सायंकाळी 6 या कालावधीत चालणार आहे. त्यामुळे या बसेसना दिवसभर कोणतीही प्रवासी सेवा करता येणार नाही. त्याचा जोरदार मनस्ताप शहरातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

कल्याण-डोंबिवली
महापालिकेच्या परिवहन सेवेत (केडीएमसी) एकूण 140 बसेस आहेत. यापैकी 79 बसेस या उद्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी वळवण्यात येणार आहेत. निम्म्यापेक्षा जास्त बसेस कल्याण, डोंबिवलीसह आसपासच्या शहरात धावणार नाहीत. त्याचा फटका या दोन्ही शहरांसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांनाही बसणार आहे. कल्याणमधून नवी मुंबई आणि ठाणे शहरात जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

नो पार्किंग झोन
१) टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सर्व्हिस रोड
२) वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका

अवजड वाहनांना प्रवेश बंदी

खारेगाव टोलनाका आणि कशेळी टोलनाकामार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस संघटना, वाहनचालक व मालकांना आदेश देण्यात आले आहेत.