कोरोनामुळे ‘डोंगरची काळी मैना घ्या’ ही आरोळी यंदा घुमलीच नाही

चैत्र महिन्यात गुढिपाडवा झाल्यानंतर वळिवाचा पाऊस पडतो. त्यानंतर डोंगर कपारीत असणाऱ्या करवंदाच्या जाळीला लालभडक करवंदे लगडतात. ती इतकी लगडतात त्यामुळे त्यांचं जाळीला ओझं होऊ लागतं आणि मग अशा दिवसांतच गावातील महिला डोंगर कपारीत डोक्यावर करवंदाची पाटी घेऊन गारगोटी तसेच आसपासच्या गावात फिरतात. फिरताना “करवंदं घ्या करवंदं” , “डोंगरची काळी मैना घ्या, काळी मैना”, अशी आरोळी देतात. पण कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे शहरात आणि गावागावांतील गल्लीबोळात ऐकू येणारी ही आरोळी यंदा घुमलीच नाही.

भुदरगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असल्याने सह्याद्रीच्या रांगा या तालुक्यात आहेत. या डोंगररागांमुळे मोठ्या प्रमाणात रानमेवा चाखायला मिळतो. डोंगर कपारीतील फये, धनगरवाडा, मिणचे बुद्रुक, गिरगाव या भागांतील महिलांना रानमेवा विकून या दोन महिन्यांत रोजगार मिळून चार पैसे मिळतात. त्यामुळे त्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लागतो.

करवंदे पिकण्यास एप्रिल-मेदरम्यान सुरुवात होते. डोंगराळ भागात पिकणारा हा रानमेवा तसा दुर्मिळच. चवीला आंबटगोड असणाऱ्या या छोट्याशा फळाने करवंदाच्या जाळ्या काळ्याभोर फळांनी भरगच्च लगडलेल्या असतात. गावातील शाळेत जाणारी मुलेही भल्या पहाटे करवंदाच्या जाळीत फिरून पाटीभर करवंदे जमा करून 5 ते 10 रुपयांना विकतात. यातून आपला शाळेचा खर्च भागवतात.

करवंदे विकण्यास दारावर आल्यानंतर कोणाच्या तरी घरी जेवायचे, सायंकाळी ऊन खाली झाल्यावर कनवटीला पैसे बांधून या महिला आऩंदाने आपल्या गावाकडची वाट धरतात. काही जणी गावात मिळणारी टमटम, वडाप या वाहनानेही सायंकाळी गाव गाठतात. करवंद आणि रानमेव्याची विक्री करून रोजगार मिळाल्याने या दुर्गम भागातील महिला या दिवसांत खूप खूश असतात, मात्र दरवर्षीप्रमाणे त्यांचा चालणारा हा रोजगार यंदा कोरोनामुळे बंद झाला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ही डोंगरची गोड काळी मैना खायला अनेकांना आवडते. त्यातच पळसाच्या हिरव्यागार पानात घालून करवंदं घेऊन एकेक तोंडात टाकण्यात एक वेगळीच मौज असते. शहरातील मुलांनाही ही काळी करवंद खायला आवडतात. निसर्गाने दिलेला हा अनमोल ठेवा कोरोनाच्या संसर्गामुळे मिळेनासा झाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी करवंदे जाळीतच सुकून वाया जातील काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या