मालवण – आचरा मार्गावर डंपर पलटी, चार वाळू कामगार गंभीर जखमी

29

सामना प्रतिनिधी, मालवण

मालवण – आचरा मार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर ओझर येथे पलटी झाला. या अपघातात डंपरमध्ये बसलेल्या तेरा वाळू उत्खनन कामगारांपैकी चारजण गंभीर जखमी झाले. अपघातप्रकरणी चालक दाऊद अम्मासाब पठाण याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू उत्खननासाठी उत्तरप्रदेश येथील तेरा वाळु कामगार देवली येथे आले होते. देवली येथून गुरुनाथ पाटकर यांच्या डंपरमधून हे कामगार वाळू उपसा करण्याचे साहित्य घेऊन कालावल खाडी पात्रानजीक हडी येथे जात होते, अशी माहिती वाळू कामगारांच्या मुकादम यांनी दिली. ओझर येथील एका अवघड वळणावर पलटी झाला. यावेळी डंपरमधील वाळू उत्खननास लागणारे लाकडाचे ओंडके व सर्व साहित्य डंपरच्या हौदात बसलेल्या दहा जण व डंपरच्या पुढील भागात ड्रायव्हर सोबत बसलेल्या तीन अशा एकूण चौदा जणांवर आदळले. या अपघातात राम प्रसाद, शाम विहारी, रमेश पटेल, रमेश यादव, सुरेश यादव, लव यादव, परमजीत राय, राजिंदर राम, रवी शंकर, सुग्रीम राम असे दहाजण जखमी झाले. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील सुरेश यादव याच्या खांद्याला व लव यादव याच्या पायाला, परमजीत राय याच्या टाचेला व रविशंकर याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले.

भरधाव वेगाने घेऊन जाणारा डंपर चालक हा नशेत असल्याचा आरोप अपघातस्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी केला. अपघाताची माहिती घेण्यास आलेल्या पोलिसांसोबतही चालकाने हुज्जत घातली. त्यानंतर अपघाताच्या ठिकाणाहून गेलेला चालक थेट ग्रामीण रुग्णालय येथे डंपर मालकासोबत आला. त्यावेळी डंपरचालक दाऊद पठाण याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला वैद्यकीय अधिकारी बचावल्या
भरधाव डंपरच्या अपघातात मालवण ओझर मार्गावरून आडवली येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात दुचाकीने जात असलेल्या महिला पशु वैद्यकीय अधिकारी मिताली कवटकर या सुदैवाने बचावल्या. त्यांच्या दुचाकीपासून अवघ्या एक फुटावर डंपर पलटी झाला. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच आपण बचावलो असेही त्यांनी अपघातानंतर सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या