
दुरुस्तीसाठी दिलेल्या मोबाईलवरून सुमारे सवा दोन लाख रुपये परस्पर वळते करून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ विलास घोडके आणि शुभम विजय पवार अशी या दोघा भामटय़ांची नावे असून त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोबाईलधारक पंकज कदम हे साकीनाका येथे राहतात. ऑक्टोबर महिन्यात मोबाईल खराब झाल्याने त्यांनी तो दुरुस्तीसाठी एका मोबाईल हब या दुकानात दिला होता. त्या दुकानात सौरभ आणि शुभम हे दोघे कामाला होते. मोबाईल दुसऱ्या दिवशी घेऊन जा असे सौरभने पंकजला सांगितले. त्यानुसार दोन दिवसांनी पंकज हे दुकानात गेले, पण सौरभने मोबाईल देण्यास टाळाटाळ केला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पंकज यांनी बँक खात्याची तपासणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्यात वळते झाल्याचे लक्षात आले. सौरभने मोबाईलमधून बँकेचा तपशील घेऊन पैशांची अफरातफर केल्याचा संशय अधिक बळवताच पंकज यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दिनकर राऊत, सहाय्यक निरीक्षक महेंद्र पुरी यांच्या पथकाने तपास सुरू केला. ते दोघे वापी येथे असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे जाऊन दोघांच्या मुसक्या आवळल्या. तीन महिन्यांनंतर सौरभ आणि शुभम पोलिसांच्या हाती लागले. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.