
वडाळा परिसरात रेकी करून दोघांनी पार्क केलेला एक टँकर शिताफीने चोरला आणि थेट गुजरात गाठले. तेथे जाऊन नंबरप्लेट बदलून तो टँकर वापरायचा त्यांचा मनसुबा होता. ठरल्याप्रमाणे ते अर्धे काम फत्ते करण्यात यशस्वीदेखील ठरले, परंतु माग काढत आलेल्या वडाळा पोलिसांनी त्यांचा मनसुबा उधळून लावत स्टेअरिंग धरणाऱ्या हातात बेडय़ा ठोकल्या.
मुरलीलाल गुप्ता याने त्याचा बेस ऑईलने भरलेला टँकर बीपीटी हॉस्पिटलसमोर 1 तारखेला पार्क केला होता. 2 तारखेच्या पहाटे गुप्ताने पाहिले असता टँकर जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने बेस ऑईलने भरलेला टँकर चोरीला गेल्याची तक्रार वडाळा पोलिसांत केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक मिलिंद जाधव, निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद खाटमोडे, राहुल मोडक, नितीन कदम व सिद्धू काटे या पथकाने तपास सुरू केला. पथकाने नाशिक रोडवरील मुलुंड टोलनाक्यापासून दुघाट फाटा येथील हॉटेल सागरपर्यंतचे 75 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा सागर हॉटेलमध्ये आरोपींनी जेवण केल्याचे व त्याचे ऑनलाइन पेमेंट केल्याचे निष्पन्न झाले. ज्या नंबरवर पैसे भरण्यात आले त्या नंबरवर माग काढत पोलीस पथक गुजरातच्या वलसाडपर्यंत पोहोचले, पण त्याचा फायदा झाला नाही. मात्र तरीही निराश न होता पथकाने तांत्रिक बाबीच्या आधारे शोध सुरू ठेवत अंकलेश्वरच्या 20 कि.मी. आधी तो टँकर थांबवला. हा टँकर चोरून नेणारे चालक दशरथ यादव (35) आणि अरमान आदित अली सिद्दिकी (20) या दोघांना पकडले.
रिकामा टँकर चोरायचा होता, पण…
साकीनाका परिसरात राहणाऱ्या आरोपींना रिकामा टँकर चोरून न्यायचा होता. गुजरातमध्ये नंबर प्लेट बदलून तो टँकर त्यांना चालवायचा होता, पण त्यांच्या हाती बेस ऑइलने भरलेला टँकर लागला आणि तो घेऊन ते पसार झाले. ही चोरी पचली असती तर दुसरा टँकर चोरायचा त्यांचा विचार होता, पण वडाळा पोलिसांनी त्याआधीच त्यांचा बंदोबस्त केला.