डुल्पिकेट एटीएम

>> दीपेश मोरे

एटीएम किंवा डेबीट कार्ड वापरताना जरा जपून… एटीएममधून तुमच्या कार्डचे क्लोनिंग होऊ शकते… कुणालाही आपला पिन नंबर सांगू नका असे एक ना अनेक सल्ले आपल्याला वारंवार मिळत असतात. पण इतकी सावधगिरी बाळगूनही कुणी आपल्या नकळत आपले डुप्लिकेट एटीएम कार्ड तयार केले तर! इतकेच नाही तर त्याचा वापर करून पैसे काढले तर. होय हे खरे आहे. बल्गेरियाचा एक नागरिक मागील तीन वर्षांपासून हेच करतोय. जुहूमध्ये एटीएमचा पिन नंबर अनेकदा चुकीचा गेल्यामुळे कार्ड अडकले आणि तोदेखील पोलिसांच्या जाळ्य़ात अडकला.

जुहू येथील एका नामांकित बँकेच्या एटीएममध्ये सोनेरी रंगाचे प्लॅस्टिक कार्ड बँक कर्मचाऱ्यांना मिळाले. हे कार्ड बोगस वाटल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एका इसमाच्या हातात बरीच सोनेरी रंगाची कार्ड असून त्याने काही कार्डमधून पैसे काढल्याचे दिसून आले. बँकेने याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निता फडके, सहायक पोलीस निरीक्षक गौड, लोंढे, उपनिरीक्षक पवार, राणे यांच्या पथकाने या इसमाला शोधून काढले. अकलांदो मायक्यालो असे या इसमाचे नाव असून तो बल्गेरियाचा नागरिक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

एटीएम, डेबिट कार्ड जपायलाच हवे
– बँकेतून एटीएम कार्ड आणि पिन नंबर मिळाल्यावर तो दुसऱ्याच्या हाती सापडता कामा नये.
– बँकेने दिलेला पिन नंबर वारंवार बदलत राहावा.
– खात्याचा तपशील विचारण्यासाठी बँकेतून फोन आल्यास माहिती देऊ नका
– एटीएम मशीन, कार्ड स्वाइप मशीन या ठिकाणी कार्डाचा वापर जपून करावा.
– पिन नंबर दाबताना आजूबाजूला कुणी नाही याची शहानिशा करा.
– कार्ड मशीनमध्ये जात नसेल तर पुन्हा टाकण्याचा प्रयत्न करू नये.
– एटीएममधून पैसे काढता येत नसतील तर अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.
– बँकेत जाऊन आपल्या खात्याचा तपशील वारंवार घ्या.

बहुतांश खातेदार चीनचे
परदेशी चोरट्य़ाकडील खातेदारांच्या माहितीमध्ये बहुतांश खातेदार हे चीनचे आहेत. त्यामुळे हा डाटादेखील चीनमध्येच चोरण्यात आल्याचा अंदाज आहे. चीनमध्ये स्कीमिंग करून की बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन डाटा चोरला याबाबत ठोस माहिती काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय
मागील तीन वर्षांपासून अकलांदो असे बोगस कार्डावरून पैसे काढत होता. देशातील खातेदारांचा बँक तपशील चोरायचा आणि परदेशात जाऊन प्लॅस्टिक कार्ड, मेग्नेस्टिक स्ट्रीप वापरून बनावट एटीएम कार्ड तयार करायचे. त्या कार्डवरून हवे तेवढे पैसे काढायचे अशी मोडस् ऑपरेंडी असलेली आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

विमान प्रवास, ऐषोराम आणि बरेच काही…
बल्गेरियन नागरिकाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. तो विमानाने हिंदुस्थानात येतो, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतो, हव्या तेवढय़ा कार्डवरून पैसे काढतो, पब, डिस्को तसेच गोव्यामध्ये धम्माल करतो आणि पुन्हा विमानाने मायदेशी. हा त्याचा क्रम मागील तीन वर्षांपासून सुरू होता.

खातेदारांचा डाटा आला कुठून?
अकलांदो याच्या घरातील झडतीमध्ये रोख रक्कम, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, हार्डडिस्क, बोगस कार्डस् तसेच बँक खात्यासंदर्भात इतर बरीच कागदपत्रे सापडली. खातेदारांचा इतका डाटा त्याच्याकडे आला कुठून? परदेशात एटीएम मशीनवर स्कीमिंग करून हा डाटा मिळविल्याची शक्यता आहे. मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणावर खातेदारांचा डाटा असल्याने बँकेतून ही माहिती लिक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या