सावधान! तुम्ही स्वयंपाकघरात वापरत असलेले जिरे भेसळयुक्त तर नाही?

906

बाजारात अनेक पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे. भेसळ आणि अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात असला तरीही अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. आता स्वयंपाकघरात फोडणीसाठी वापरले जाणारे जिरेही या भेसळीपासून सुटले नसल्याचे समोर आले आहे. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरले जाणाऱ्या गुणकारी जिऱ्यांमध्य़े भेसळ होत असल्याने खळबळ उडाली आहे.

जिऱ्याचा वापर स्वयंपाकघरासह आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठीही केला जातो. स्वयंपाकघरात पदार्थांना फोडणी देण्यासाठी जिऱ्याचा हमखास वापर केला जातो. तसेच शेव बनवतानाही जिऱ्याची पावडर त्याच मिसळून चव वाढवली जाते. परंतु दिल्लीतील बवाना भागात भेसळयुक्त जिरे बनवणारा कारखाना असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यामध्ये तयार होणारे जिरे गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवण्यात येत होते. भेसळयुक्त जिरे झाडूच्या बारीक चुऱ्यापासून व दगडांपासून बनवले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कारखान्यातून तब्बल 20 हजार किलो भेसळयुक्त जिरे आणि 8 हजार किलो कच्चा माल जप्त केला आहे.

भेसळयुक्त जिरे बनवण्यासाठी फुलं आणि झाडूचा चुरा केला जायचा. त्यानंतर गूळ गरम करून त्यात हा चुरा मिक्स केला जायचा. सुकल्यानंतर त्यामध्ये दगडाची पावडर मिसळली जायची आणि त्यापासून जिरे बनवले जायचे, असे आरोपींनी सांगितले. तसेच 100 किलो जिऱ्यांमध्ये तब्बल 8 हजार रुपयांचा फायदा व्हायचा असेही आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले.

भेसळयुक्त जिरे कसे ओळखाल…

एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्यात बाजारातून आणलेले जिरे टाका. जर जिऱ्याचा रंग निघू लागला किंवा पटकन तुकडा पडला तर ओळखून जा की हे भेसळयुक्त जिरे आहेत. शूद्ध जिरे हे मजबूत आणि पक्के असतात. पाण्यामध्ये टाकले तरीही आहे तसाच राहतो.

आपली प्रतिक्रिया द्या